मंगळावर जायचे खाजगी प्रयत्न

Mars-One-Habitat-On-Mars

मार्स वनच्या मंगळवरील वसाहतीचे कल्पनाचित्र

मानवाने चंद्रावर पाउल ठेवून ४५ वर्षे उलटून गेली आहेत. आता मानवाला मंगळाची आस लागली आहे. जगातील अनेक वेगवेगळे देश मंगळावर आपली याने पाठवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि भारतही यात मागे नाही. परंतु भारताची इस्रो, अमेरिकेची नासा किंवा युरोपमधील इसा या सरकारी संस्था आहेत. पण आता मात्र काही खाजगी कंपन्यांनीही मंगळावर जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

खाजगी प्रयत्नापैकी सर्वात अधिक चर्चिलेला प्रकल्प म्हणजे ‘मार्स वन’. या प्रकल्पाचे उद्दीष्ट मंगळावर मानवी वसाहत करणे हे आहे. डच उद्योजक बास लान्सडॉर्प याने हा प्रकल्प हाती घेतला आहे. २०११ मध्ये बान्स लान्सडॉर्प आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ‘मार्स वन’ या संस्थेची स्थापना केली. स्थापनेच्या पहिल्या वर्षी या संस्थेने फिझीबिलीडी स्टडी – संस्थेचे उद्दीष्ट शक्य होईल का याचा अभ्यास केला. तांत्रिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक अशा वेगवेगळ्या निकषांवर या उद्दीष्टीच्या शक्यता पडताळून पाहण्यात आल्या. या अभ्यासानुसार २०२३ पर्यंत पहिल्या मानवी वसाहतकारांना मंगळावर पाठवता येईल असेन कंपनीने जाहिर केले.  २०१२ मध्ये मार्स वनला गुंतवणूक मिळवणे शक्य झाले. अखेर एप्रिल २०१३ मध्ये न्यूयॉर्क आणि शांघायमधील पत्रकार परीषदेत मार्स वन ने आपला अंतराळवीर निवडण्याचा कार्यक्रम जाहिर केला. कंपनीच्या वेबसाइटनुसार कार्यक्रम जाहीर केल्यावर केवळ काही महिन्यातच तब्बल दोन लाख लोकांचे अर्ज मंगळावर जाण्यासाठी कंपनीला मिळाले. परंतु डॉ. जोसेफ रोशे या शास्त्रज्ञाने मात्र कंपनीचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते कंपनीला फक्त २,७६१ लोकांचेच अर्ज आले. ज्या लोकांची या कार्यक्रमातून निवड होणार होती त्यांना मंगळावर जायला मिळणार असले तरी तिथून परत येण्याची मात्र कुठलीही तरतूद या मोहीमेमध्ये केलेली नाही. जे लोक मंगळावर जातील ते तिथेच राहून मानवी वसाहत करतील अशी योजना आहे. त्यामुळे दोन लाख लोक आपला जीव द्यायला तयार होतील यावर विश्वास बसणे थोडे कठीणच आहे. या आलेल्या अर्जातून डिसेंबर २०१३ मध्ये १०७ देशातील १,०५८ लोकांची निवड करण्यात आली. त्यामध्ये ५८६ पुरुष होते व ४७२ स्त्रिया होत्या. या लोकांपैकी शारीरीक चाचणीतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून ५० पुरुष व ५० स्त्रियांची निवड करण्यात आली. या पुढील चाचण्या मात्र अजून बाकी आहेत. मार्स वन कंपनीचा या सर्व प्रक्रियेचा रिएलिटी शो करुन पैसे मिळवायचा बेत आहे. त्यामुळे पुढील निवड प्रक्रियचे प्रसारण करण्याविषयी टिव्ही नेटवर्कबरोबर चर्चा सुरु आहे. दरम्यान कंपनीने डिसेंबर २०१३ रोजी २०१८ मध्ये रोबॉटीक मिशन करणार असल्याचे जाहीर केले आहे. मार्च २०१४ मध्ये कंपनीने उविंगु या कंपनीबरोबर भागीदारी जाहीर केली. मार्स वनच्या मिशनमध्ये उविंगु कंपनीचे मंगळाचे नकाशे वापरण्यात येणार आहेत. अलिकडेच जाहिर केलेल्या सुधारीत योजनेनुसार पहिली चार  लोकांची (दोन पुरुष व दोन स्त्रिया) तुकडी मंगळावर २०२३ च्या ऐवजी २०२७ ला पोचणार आहे. २०३५ पर्यंत एकूण २० लोकांची मंगळावर रवानगी करायची कंपनीची योजना आहे.

मार्स वनच्या या कार्यक्रमाचा प्रसारमाध्यमात खूप मोठा बोलबाला झाला असला तरी अलिकडेच अनेक शास्त्रज्ञांनी आणि अंतराळ संशोधन क्षेत्रातील तज्ञांनी मार्स वनवर अविश्वास व्यक्त केला आहे. आणि त्यामागे अनेक कारणे आहेत. कंपनीचे अनेक दावे खोटे असल्याचे आता प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होत आहे. वर दिलेल्या प्रमाणे कंपनीला कधीही २ लाख लोकांचे अर्ज मिळाले नव्हते असे १०० अंतराळवीरापैकी एक डॉ. जोसेफ रोशे यांनी म्हटले आहे. तसेच कंपनी या अंतराळवीरांना पैसे मिळवण्यासाठी वापरत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. जे अंतराळवीर कंपनीला अधिक पैसे मिळवून देतील त्यांना प्राधान्य दिले जाईल असाही आरोप त्यांनी केला आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये लॉकहीड मार्टीन आणि सरे सॅटेलाइट टेक्नॉलॉजी कंपनीने डिसेंबर २०१३ मध्ये प्राथमिक अभ्यासाचे कंत्राट मार्स वन कडून मिळाल्याचे मान्य केले असले तरी हे कंत्राट आता संपले असून नवीन कुठलेही कंत्राट मार्स वनने दिलेले नाही. त्यामुळे मंगळावर जाण्याचे तंत्रज्ञान नक्की कोण विकसित करत आहे यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मार्स वनने आपल्या प्राथमिक अभ्यासात मंगळावर पहिल्यांदा पोचण्याचा खर्च ६ अब्ज डॉलर्स येईल असे म्हटले आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाही सध्या मंगळावर मानव पाठवण्याची तयारी करत आहे. या संदर्भात नासाने २००९ मध्ये तयार केलेल्या एका अंदाजानुसार मंगळावर काही अंतराळवीर पाठवून त्यांना परत बोलवण्याच्या मिशनचा खर्च तब्बल १०० अब्ज डॉलर्स इतका होईल असे म्हटले आहे. त्यामुळे नासापेक्षा इतक्या कमी खर्चात मार्स वन लोकांना मंगळावर कसे पाठवणार असाही प्रश्न आता लोक विचारत आहेत. मार्स वनचा मंगळावर जाण्यासाठी स्पेस एक्स कंपनीचे ‘फाल्कन हेवी’ रॉकेट वापरण्याची योजना आहे. परंतु मे २०१३ पर्यंत स्पेस एक्स कंपनीने आपली मार्स वनशी कुठल्याही प्रकारची बोलणी झाली नसल्याचे म्हटले होते. २०१४ च्या मार्च मध्ये स्पेस एक्सने अशा प्रकारची बोलणी सुरु झाल्याचे मान्य केले. परंतु मार्स वनच्या योजनेच्या गरजा वेगळ्या असून त्यासाठी लागणारे रॉकेट तयार करण्याची कुठलीही योजना सध्यातरी नसल्याचे स्पेस एक्सने जाहीर केले आहे. त्यामुळे मार्स वनसाठीचे रॉकेट कोण बनवणार हेही प्रश्नचिन्हच आहे. मार्स वनने यासगळ्यासाठी लागणारे अब्जावधी डॉलर्स नक्की कुठून आणणार हेही स्पष्ट केलेले नाही.

२७ फेब्रुवारी २०१३ रोजी मंगळाला गवसणी घालणारा अजून एक खाजगी प्रयत्न जगजाहीर झाला. डेनिस टिटो या अमेरिकन उद्योजकाने आपल्या इन्सिपरेशन मार्स फाउंडेशनतर्फे एका जोडप्याला (एक पुरुष आणि एक स्त्री) मंगळाच्या कक्षेत पाठवायचे ठरवले. तरुण मुलामुलींना मोठी स्वप्ने पहायला स्फूर्ती मिळावी म्हणून त्याचा हा अट्टाहास होता. डेनिस टिटोची अशा प्रकारचे स्वप्न पहाण्याची ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वी त्याने अंतराळात भरारी मारुन दाखवली होती. रशियन फेडरल स्पेस एजन्सीच्या मदतीने डेनिस टिटोने पहिली व्यावसायिक अंतराळ भरारी मारली. २८ एप्रिल २००१ ला उड्डाण केलेल्या सोयुझ टी एम ३२ मोहिमेध्ये डेनिस टिटो अंतराळ पर्यटक म्हणून सामिल झाला होता. डेनिस टिटोने या मोहिमेअंतर्गत एकंदरीत ७ दिवस, २२ तास आणि ४ मिनिटे अंतराळात घालवले आहेत.  डेनिस टिटोने या मोहिमेसाठी तब्बल २० दशलक्ष डॉलर्स खर्च केले.

या प्रकल्पासाठी एकून १ अब्ज डॉलर्स खर्च येणार असून त्यापैकी डेनिस टिटो पहिल्या दोन वर्षात १०० दशलक्ष डॉलर्स आपल्या खिशातून घालणार होता. या मोहिमेअंतर्गत २०१८ मध्ये एका जोडप्याला यानातून मंगळाच्या अगदी जवळ जाऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणण्यात येणार होते. मंगळ आणि पृथ्वीच्या २०१८ मधील स्थानामुळे हा परतीचा प्रवास फक्त ५०१ दिवसात करणे शक्य होणार आहे. तसेच २०१८ मधील विशिष्ट वेळात कमीत कमी सौर किरणोत्साराचा सामना या यानाला करावा लागणार होता. परंतु नोव्हेंबर २०१३ मध्ये एका संसदीय समितीच्या पुढे साक्ष देताना डेनिस टीटो याने अमेरिकन सरकार आणि नासाच्या मदतीशिवाय ही योजना यशस्वी होणार नाही हे स्पष्ट केले. डेनिस टिटोनुसार खाजगी लोकांकडून या मोहिमेसाठी आपण फक्त ३०० दशलक्ष डॉलर्सच उभे करु शकणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अमेरिकन सरकारच्या अंतराळ संशोधन संस्थेने ७०० दशलक्ष डॉलर्सची मदत न केल्यास ही मोहीम रद्द होईल असे त्याने जाहीर केले. नासाने उत्तरादाखल आपण खर्च करण्यासा असमर्थ असल्याचे स्पष्ट केले. ही योजना अयशस्वी झाली नाही तर २०२१ मध्ये अजून एक प्रयत्न करता येईल असेही त्याने म्हटले आहे. २०२१ मधील मोहीम ८८ दिवसांनी जास्त असून यात शुक्र आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या जवळ जाऊन यान परत येईल. परंतु हा प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता खूपच कमी असल्याने डेनिस टिटोने सध्या या प्रकल्पासाठी पैसे उभे करणे बंद केले आहे.

एकंदरीत मंगळावर मानवाला घेऊन जाणारे हे दोन्ही खाजगी प्रयत्न अयशस्वी होतील अशीच चिन्हे दिसत आहेत. नासा सध्या अशा प्रकारच्या मोहिमेला आवश्यक असणारे अंतराळयान (ओरायन) आणि रॉकेट (स्पेस लॉंच सिस्टीम) बनवत आहे. त्यांच्या अंदाजानुसार मानवाला मंगळावर २०३५ मध्ये पाउल ठेवणे शक्य होईल. इतर कुठल्याही देशाची अंतराळ संशोधन संस्था याआधी मानवाला मंगळावर पोचवण्याची सध्या तरी चिन्हे मला तरी दिसत नाहीत.

One thought on “मंगळावर जायचे खाजगी प्रयत्न

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s