अॅपल वॉच

Apple-Watch

हजारो लाखो लोकांच्या लांब प्रतिक्षेचा अखेर अंत झाला आहे. ज्या गोष्टीची ते आतुरतेने वाट पहात होते ती गोष्ट अखेर २४ एप्रिल रोजी बाजारात येणार आहे. लोक यावेळीही लांब रांगा लावून त्या गोष्टीचे स्वागत करतील. अनेक दुकानांच्या बाहेर पोलिस बोलावून गर्दीचे नियंत्रण करावे लागेल. काही लोक आदल्या दिवशी रात्रीपासून दुकानाबाहेर तंबूही ठोकतील. अमेरिकेतल्या असंख्य दुकानात पहिल्या दिवसाच्या शेवटी ती वस्तू मिळणार नाही. पहिले दोन तीन आठवडे असाच वेडेपणा चालेल! ज्या जमान्यात लोकांनी घड्याळे वापरणेच सोडून दिले आहे त्या जमान्यात घड्याळाची फॅशन पुन्हा आणण्यासाठी जबाबदार असलेली ही वस्तू म्हणजे अॅपल वॉच!

या घड्याळाचा वापर करून तुम्ही फोन करु शकता किंवा फोन घेऊही शकता.  या घड्याळाचा पूर्ण वापर करण्यासाठी ते आयफोनला कनेक्ट करणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहेत त्यांच्यासाठी या घड्याळाचा वापर केवळ घड्याळ म्हणूनच होऊ शकेल. परंतु आयफोनला कनेक्ट केल्यावर मात्र या घड्याळामधील असंख्य सुविधा खुल्या होतात.  या घड्याळाचा वापर फिटनेस ट्रॅकर म्हणून होऊ शकतो. हे घड्याळ तुम्ही किती चाललात, किती उभे राहीलात, तुमच्या ह्रदयाचे ठोके इत्यादी गोष्टी मोजू शकते.  याव्यतिरीक्त दुकानामध्ये क्रेडीट कार्डा ऐवजी या घड्याळ्याच्या मदतीनेही पैसेही देता येतात! अॅपलने या वॉचमध्ये टॅप्टीक इंजिनही घातले आहे. या इंजिनामुळे तुम्हाला जेव्हा एस एम एस मिळतो तेव्हा हे वॉच थरथरते. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट मिळण्यासाठी अशा प्रकारच्या टॅप्टीक फिडबॅकचा किंवा थरथरीचा या घड्याळामध्ये वापर केला गेला आहे. या टॅप्टीक इंजिनचा वापर करुन तुम्ही जास्त वेळ बसलात तर हे  घड्याळ थरथरून तुम्हाला उभे रहायची अथवा चालायची आठवणही करून देते!  या वॉचमध्ये डिजीटल टच नावाचे एक नवीन अॅप अॅपलने घातले आहे. ह्या अॅपचा वापर करून वॉच घातलेले लोक एकमेकांना बोटांनी काढलेली चित्रे पाठवू शकतात. एव्हढेच नव्हे तर अॅपचा वापर करून घड्याळे घातलेली प्रेमी युगुले एकामेकांना त्यांच्या ह्रदयाचे ठोकेही पाठवू शकतात! अॅपलने या घड्याळामध्ये क्राउन नावाचे नवीन बटन घातले आहे. ज्याप्रमाणे माउसमुळे पी सीच्या क्षेत्रात क्रांती घडून आली त्याचप्रमाणे क्राउनमुळे स्मार्टवॉचमध्ये क्रांती घडून येईल असे अॅपलचे मत आहे. क्राउनचा वापर करून तुम्हाला या घड्याळातील वेगवेळ्या सुविधा वापरता येतात. या घड्याळाला टचस्क्रीन असल्याने क्राउनवर अवलंबून रहायची गरज नाही. पण बोटाचा आकार जास्त असल्याने अनेक वेळा बोटाने टचस्क्रिनचा वापर करताना घड्याळावरील गोष्टी दिसत नाहीत. हे टाळण्यासाठी क्राउन कामी येऊ शकतो.


अॅपलने आपल्या कार्यक्रमात अॅपल वॉचचे अनेक अभिनव उपयोग दाखवले. तुम्ही हॉटेलमध्ये चेक इन केल्यावर तुम्हाला एक कार्ड दिले जाते. हे कार्ड वापरुन तुम्ही तुमच्या रुमचा दरवाजा उघडू शकता. अॅपल वॉच असल्यावर अशा प्रकारच्या कार्डाची गरज उरणार नाही. तुम्ही तुमच्या अॅपल वॉचच्या सहाय्याने तुमची खोली उघडू शकाल. किंबहुना कुठल्याही प्रकारची ब्लूटूथवर चालणारी कुलूपे तुम्ही उघडू शकाल. एका मुलीने आपल्या वडीलांना मी चावी विसरले आहे, मला घरात जाता येत नाही असा मेसेज पाठवला. हा मेसेज आल्यावर वडीलांनी अॅपल वॉचवर बटन दाबून घराच्या गराजचे दार उघडले!

इतक्या चांगल्या गोष्टी भरलेल्या असल्या तरी या घड्याळ्याची बॅटरी फक्त १८ तासच चालणार आहे. याबद्दल मात्र सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच जसजसे हे घड्याळ जुने होईल तसतसे १८ तासाऐवजी १५/१६ तासामध्येच बॅटरी चार्ज करावी लागेल.

अॅपलने हे घड्याळ अनेक वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध करून दिले आहे. मुख्यत:  या घड्याळाच्या पडद्याचे दोन वेगवेगळे आकार उपलब्ध होणार आहेत – १.५ इंच व १.६५ इंच. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डायल व पट्ट्यांचे पर्याय अॅपलने उपलब्ध करून दिले आहे. आकार, डायल आणि पट्ट्यांवरून घड्याळाची किंमत ठरेल.  सर्वात स्वस्त अॅपल वॉचची किंमत तब्बल ३५० डॉलर्स (अंदाजे २२,००० रुपये) एवढी असणार आहे. आणि सर्वात महाग अॅपल वॉचची किंमत तब्बल १७,००० डॉलर्स (१० लाख रुपये) एव्हढी असणार आहे!!! ह्या घड्याळाची डायल १८ कॅरेट सोन्याची असणार आहे. १७,००० डॉलर्स मोजून किती लोक घड्याळे घेतील हा प्रश्न असला तरी जाणकारांच्या मते अॅपलचे १७,००० चे घड्याळ म्हणजे एक मार्केटींग गिमिक आहे. खुद्द अॅपललाही जास्त लोक महागातले घड्याळ घेणार नाहीत हे माहित आहे, परंतु अशा प्रकारचे घड्याळ बाजारपेठेत आणून अॅपलने आपण उंची वस्तूंच्या बाजारपेठेतील एक खेळाडू आहोत हे सिद्ध केले आहे.

अॅपलने या घड्याळाबरोबर रिसर्चकिट नावाचे सॉफ्टवेअरही घोषित केले आहे. ह्या सॉफ्टवेअरचा वैद्यकिय संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होणार आहे. अॅपल वॉच फिटनेस ट्रॅकर म्हणून काम करु शकते. याचाच अर्थ तुमच्या शरीरीशी संबंधित अनेस गोष्टीचे मोजमाप अॅपल वॉच घेऊ शकते. अॅपल वॉच तुमच्या ह्रदयाचे ठोकेही मोजू शकते. ही सर्व माहिती अॅपल वॉच तुमच्या आयफोनमध्ये साठवते. फोनमधील सॉफ्टवेअरच्या मदतीने ही माहीती आता संशोधकांना मिळू शकते. अॅपलने ऑक्सफर्ड विद्यापीठापासून ते बिजींग मधील शुनावु हॉस्पिटल सारख्या प्रतिष्ठीत संस्थांना या उपक्रमात सहभागी करुन घेतले आहे. पार्किन्सन्स आजार, मधुमेह, अस्थमा, स्तनाचा कॅन्सर आणि ह्रदयरोगाशी संबंधित अशी पाच वेगवेगळी अॅप या उपक्रमातर्फे उपलब्ध केली गेली आहेत. ज्या लोकांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांना ही अॅप डाउनलोड करुन वेगवेगळ्या संशोधनात मदत करता येईल.  त्यांच्या शरीराची माहिती संशोधन संस्थांकडे पाठवली जाईल. उदाहरणार्थ एखाद्या संशोधनासाठी वेगवेगळ्या वयोगटातील लोकांच्या ह्रदयाचे ठोके एखादा विशिष्ट व्यायाम केल्यावर मोजणेआवश्यक आहे. या संशोधनात सामिल झालेल्या स्वयंसेवकांना तो व्यायाम सांगितलेल्या वेळी करायचा.  त्यांच्या ह्रदयाच्या ठोक्यांची माहिती संशोधन संस्थाना त्यांच्या वयोगटाबरोबर आपोआपच मिळेल. संशोधन संस्था या माहीतीचा वापर त्यांच्या अभ्यासासाठी करतील. पूर्वी अशा प्रकारच्या संशोधनासाठी देशभर शोधाशोध करून लोकांना सहभागी करून घ्यावे लागत असे. परंतु अॅपलने तयार करुन दिलेल्या या आगळ्या वेगळ्या व्यासपीठामुळे अशा प्रकारच्या संशोधनासाठी लोक सहज उपलब्ध होतील. अर्थातच ज्या स्वयंसेवकांनी अशा प्रकारच्या संशोधनता भाग घेतला आहे त्या सगळ्याच लोकांची माहिती संशोधनासाठी उपयुक्त ठरेलच असे नाही. जास्त स्वयंसेवक मिळाले तरी ती माहीती संशोधकांना चाळून घ्यावी लागेल. पण संशोधकांसाठी यापेक्षा चांगला पर्याय उपलब्ध नाही हे मात्र नक्की.

अॅपलचा प्रमुख टिम कुक याच्या मते अॅपल वॉच हे आतापर्यंतच्या अॅपलच्या उत्पादनांपैकी सर्वात खाजगी – तुमच्या जवळ जाणारं – उपकरण आहे. अनेक वेळा आपण पाहतो की चार लोकं हॉटेलात बसली आहेत पण एकमेकांशी गप्पा मारण्याच्या ऐवजी आपल्या फोनवर काही ना काही करत आहेत. अॅपलच्या मते आता लोक असे करण्याऐवजी फक्त आपल्या घड्याळाकडे एक दृष्टीक्षेप टाकतील. तुमच्या खिशात अथवा पर्समध्ये टाकलेला फोन तुम्हाला बाहेर काढावाच लागणार नाही. आणि त्यामुळे लोक एकमेकांशी जास्त बोलतील, फोनवर कमी वेळ घालवतील! अर्थातच असे प्रत्यक्ष होईल की नाही ते काळच ठरवेल.

अॅपल वॉचची प्रसिद्धी माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु असली तरी ते प्रत्यक्ष बाजारपेठेत यशस्वी होईल की नाही याबद्दल जाणकारांमध्ये मतभेद आहेत. काही जाणकारांनी पहिल्या वर्षी २५ दशलक्ष घड्याळे आणि २०१७ पर्यंत ७० दशलक्ष घड्याळे खपतील असा अंदाज वर्तवला आहे. परंतु मला अॅपल वॉचचा खप तितका होईल की नाही याबद्दल मला शंका आहे. लोक ३५० डॉलर्सतर अमेरिकेत फोनसाठी सुद्धा खर्च करत नाही. अनेक लोक सेल्युलार सर्विस कंत्राटाबरोबर फोन घेत असल्याने त्यांना आयफोन फक्त २०० डॉलर्समध्ये मिळतो. भारतासारख्या देशात जिथे आयफोनसाठी ७०-८० हजार रुपये मोजावे लागतात तिथे आयफोनचा प्रसार अमेरिकेच्या मानाने बराच कमी आहे. त्यामुळे सुरवातीचे उत्साही लोक सोडून किती सर्वसामान्य लोक अॅपल वॉच घेतील की नाही हे पहायला काही काळ थांबणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s