हिलरी क्लिंटन ईमेल घोटाळा

 

Hillary-Clinton-Closeup-Wikipediaहिलरी क्लिंटन माहीत नाही असे वाचक भारतातही फार कमीच असतील. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची पत्नी आणि त्याहूनही त्यांची जास्त चांगली ओळख म्हणजे अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री.  हिलरी क्लिंटन २०१६ च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. परंतु रिंगणात उतरण्याआधीच न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. आणि हा गौप्यस्फोट तंत्रज्ञानविषयक आहे. तंत्रज्ञानामुळे राजकारणी कसे अडचणीत येऊ शकतात याचा एक नवीन अनुभव अमेरिका सध्या घेत आहे.

२ मार्च २०१५ रोजी न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्द केलेल्या वृत्तानुसार हिलरी क्लिंटन यांनी परराष्ट्रमंत्री असताना सरकारी कामकाजासाठी आपल्या खाजगी ईमेलचा वापर केला. खरंतर थोड्याफार प्रमाणात खाजगी ईमेलचा वापर करण्यात काहीच गैर नाही. परंतु या बातमीप्रमाणे हिलरी क्लिंटन यांनी सरकारी कामासाठी फक्त खाजगी ईमेलचाच वापर केला. सरकारी ईमेलचा वापर पूर्णपणे टाळला. एव्हढेच नव्हे तर चार वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्याकडे सरकारी ईमेल अकाउंटच नव्हते! अमेरिकन कायद्यानुसार प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांचा इमेल रेकॉर्ड जपून ठेवला  जातो. बरं खाजगी ईमेल वापरली तर वापरली पण मग ह्या ईमेल इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सरकारी सर्व्हरवर जपून ठेवण्याचा कुठलाही प्रयत्न हिलरी क्लिंटनच्या कर्मचाऱ्यांनी केला नाही. हिलरी क्लिंटन यांनी २०१३ च्या सुरुवातीलाच परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. हे वृत्त छापून येण्याच्या दोन महिने आधीच्या काळात अमेरिकन संसदेची एक समिती बेंगाझीमधील अमेरिकन दूतावासावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करत होती. हा हल्ला हिलरी क्लिंटन परराष्ट्र मंत्री असताना झाला होता. समितीने परराष्ट्रमंत्रालयाकडे ह्या हल्ल्याच्या वेळच्या सर्व इमेल  तपासण्यासाठी मागीतल्या. त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाच्या असे लक्षात आले की त्यांच्याकडे हिलरी क्लिंटन यांच्या त्या काळातल्या इमेलच नाहीत. मंत्रालयाने मग हिलरी क्लिंटन यांना  सर्व ईमेल जमा करण्यास सांगितले. हिलरी क्लिंटन यांच्या सल्लागारांनी त्यांच्या इमेल चाळून त्यातील ५५,००० इमेल कागदावर प्रिंट करून अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाला दिल्या.

हा लेख येण्याच्या आधीच्या घटना आता वेगवेगळ्या वृत्तपत्रातून प्रसिद्द होत आहेत. त्यामुळे हिलरी क्लिंटनवरील आरोप अधिक गंभीर बनतो. २००० साली इमेलचा उदय होऊन काही वर्षे लोटली होती. इमेल हळू हळू सर्वत्र पसरायला लागली होती. हिलरी क्लिंटन त्यावेळी सिनेटर (अमेरिकन संसेदेच्या वरीष्ठ सभागृहाच्या सदस्या) होत्या. त्यावेळच्या एका व्हिडीओमध्ये माझी इतकी चौकशी झाली असल्याने मी कधीही ईमेल वापरणार नाही असे हिलरी क्लिटंन म्हणताना दिसतात. इमेलचा वापर पुरावा म्हणून होऊ शकतो हे हिलरी क्लिंटनसारख्या कायदेतज्ञाला कळायाला वेळ लागला नाही. आपण गोत्यात येऊ म्हणून इमेलचा वापर टाळण्याकडेच त्यांचा कल दिसतो. २००५ मध्ये अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या मॅन्युअलमध्ये कर्मचाऱ्यांना खाजगी ईमेल वापरण्याबद्दलचे नियम घातले. या नियमांनुसार खाजगी इमेल वापरल्या गेल्याच तर त्या सरकारी सर्व्हरवर घालता याव्यात म्हणून सरकारकडे जमा केल्या पाहिजेत असा नियम केला गेला. त्याव्यतिरीक्त कुठल्याही प्रकारची गुप्त माहिती अथवा संवेदनाशील माहिती खाजगी ईमेलमध्ये घालण्यास मनाई करण्यात आली. १ फेब्रुवारी २००८ रोजी हिलरी क्लिंटन यांच्या त्यावेळच्या कर्मचाऱ्यानी एक आय पी अॅड्रेस (चार वेगवेगळ्या अंकाचा प्रत्येक सर्व्हर ला असलेला क्रमांक उदा – १०.५६.१२३.१११) नोंदवला. जानेवारी २००९ रोजी clintonemail.com नावाच्या इंटनेट डोमेनची नोंदणी जस्टीन कूपर या बिल क्लिंटन यांच्या कर्मचाऱ्यानी केली. clintonemail.com साठी आधी नोंदणी केलेला आय पी अॅड्रेस वापरण्यात आला. या दोन्ही नोंदणीसाठी वापरलेला पत्ता हिलरी क्लिंटन यांच्या न्यूयॉर्क राज्यातील घरातला आहे. आणि त्यातूनही महत्वाची गोष्ट म्हणजे  इंटरनेट डोमेनची नोंदणी हिलरी क्लिंटन यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार सांभाळण्याच्या फक्त एक आठवडा आधी झालेली आहे – हिलरी क्लिंटन यांनी २१ जानेवारी २००९ ला परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार हाती घेतला. त्यानंतर हिलरी क्लिंटन आपल्या या खाजगी इमेलचा वापर करू लागल्या. या वेळी इमेलचा वापर टाळण्याच्या पुढे गेलेला होता. २००९ पर्यंत इमेल आवश्यकता बनलेली होती त्यामुळे त्यांच्यापुढे इमेल टाळण्याचा पर्यायच उपलब्धे नव्हता. हिलरी क्लिंटनव्यतिरीक्त या इमेलसर्व्हर तर्फे इतरही काही लोकांना इमेल अकाउंट देण्यात आले. किंबहुना या इमेलचे अकाउंट असणे हे एक प्रतिष्ठेचा प्रश्न बनला. तुम्ही क्लिंटन यांच्या किती जवळचे आहात हे तुमच्याकडे या इमेलचे अकाउंट आहे की नाही यावरून ठरवता येत असे. हिलरी क्लिंटन यांनी या इमेलचा वापर सर्वच कामांसाठी केला – त्यांच्या मुलीच्या लग्नाचे व्यवस्थापन पाहण्यासाठी, क्लिंटन फाउंडेशनचे काम पाहण्यासाठी व परराष्ट्र मंत्र्याच्या कामकाजाकरता. परंतु त्यांनी खाजगी इमेलचा वापर केल्याने अमेरिकेच्या फ्रिडम ऑफ इन्फॉर्मेशन कायद्यानुसार या इमेल लोकांना पाहता येत नाहीत. अमेरिकेचा रिडम ऑफ इन्फॉर्मेशन कायदा हा आपल्याकडील राइट टू इन्फॉर्मेशन – माहीतीच्या अधिकाराप्रमाणे आहे.

या सर्व प्रकरणामधून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हिलरी क्लिंटन जी खाजगी इमेल सेवा वापरत होत्या ती सुरक्षित होती का? त्यामध्ये एनक्रिप्शन लावलेले होते का? हिलरी क्लिंटन यांचा अमेरिकन परराष्ट्रमंत्री म्हणून अनेक राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षांशी इमेल व्यवहार चालत असे. या सर्व ईमेल बाहेर फुटल्या तर मोठी आफत ओढवू शकते. आणि त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे हिलरी क्लिंटन यांना असे वागायची गरजच काय होती? हिलरी क्लिंटन यांना नक्की काय लपवायचे होते? ज्या ५५,००० इमेल परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आल्या त्या कुठल्या आधारे निवडण्यात आल्या? निवडलेल्या इमेल व्यतिरीक्त, परराष्ट्र मंत्रालयाला न दिलेल्या अशा काही इमेल आहेत काय?

दरम्यान हिलरी क्लिंटन यांच्या प्रवक्त्यांनी मात्र झाल्या प्रकरणामध्ये हिलरी क्लिंटन यांनी कुठलेही बेकायदेशीर काम केले नसल्याचे म्हटले आहे. खुद्द हिलरी क्लिंटन यांनी या प्रकरणावर ट्विट करून  “माझ्या इमेल लोकांकरता खुल्या कराव्यात असे मी परराष्ट्र मंत्रालयाला सांगितले आहे. मंत्रालय ह्या इमेल लवकरच खुल्या करणार आहे” असे म्हटले आहे. खुद्द राष्ट्राध्यक्ष ओबामांनीही हिलरी क्लिंटन यांना पाठींबा दिला आहे. हिलरी क्लिंटन अतिशय उत्तम परराष्ट्र मंत्री होत्या आणि माझे सरकार पारदर्शकतेसाठी कटीबद्ध आहे असे त्यांनी म्हटले आहे. ओबामा स्वत: सरकारी ब्लॅकबेरीच वापरत असून हिलरी क्लिंटन यांनी आपल्या इमेल लोकांसाठी खुल्या केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. लोकांना जी माहिती हवी आहे ती आता मिळू शकेल असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान इतर अमेरिकन राजकारण्यांनीही अशा प्रकारे खाजगी इमेल वापरल्याची उदाहरणे आहेत. जेब बुश अमेरिकेच्या फ्लोरीडा राज्याचे गव्हर्नर असताना त्यांनीही jeb.org  ह्या डोमेनवरील खाजगी इमेल वापरल्या होत्या. जेब बुश यांनी हे प्रकरण जाहीर होण्याआधीच आपल्या इमेल लोकांपुढे जाहीर केल्या होत्या. योगायोगाने जेब बुशही २०१६ च्या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरणार आहेत. परंतु जेब बुश यांनी हिलरी क्लिंटनप्रमाणे संपूर्णपणे खाजगी इमेलचा वापर केला आहे का हे स्पष्ट झालेले नाही. राष्ट्राध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरणारे अजून एक उमेदवार – व्हिस्क़ॉन्सिन राज्याचे गव्हर्नर स्कॉट वॉकर यांनीही ते मिलवाकी काउंटीचे प्रमुख म्हणून काम करताना सरकारी कामासाठी खाजगी इमेलचा वापर केला होता हे आता सिद्ध झालेले आहे. पण या सर्वांपेक्षाही महत्वाचे उदाहरण म्हणजे केनियमधील अमेरिकन राजदूत स्कॉट ग्रेशन यानीही आपल्या खाजगी इमेलचा वापर सरकारी कामासाठी केला होता. २०१२ मध्ये स्कॉट ग्रेशन यांना परराष्ट्र मंत्रालयाने राजीनामा देण्यास भाग पाडले. गंमत म्हणजे हा राजीनामा देण्यास सांगताना जी कारणे दिली गेली त्यात जीमेल (खाजगी इमेल) चा वापर हे ही एक कारण होते! ज्यावेळी हे घडले त्यावेळी हिलरी क्लिंटन परराष्ट्र मंत्री होत्या आणि त्या खाजगी इमेलचा वापर खुशाल करत होत्या! हिलरी क्लिंटन प्रकरण बाहेर आल्यावर त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हटले आहे.

अनेक वृत्तपत्रे या प्रकरणाला घोटाळा म्हणून म्हणत असले तरी सर्वसामान्यांच्या नजरेत तो मोठा घोटाळा आहे असे वाटत नाही. वृत्तपत्रांनी हा विषय उचलून धरला असला तरी सर्वसामान्य माणसे याची मोठ्या प्रमाणावर चर्चा करताना आढळत नाहीत. या घोटाळ्यामुळे हिलरी क्लिंटन यांना २०१६ च्या निवडणुकीत कितपत नुकसान होईल याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s