अॅपल कार

Apple-Logo-transparent

अॅपल खरोखरच कार बनवत आहे का? अमेरिकन वृत्तपत्रांचे रकाने सध्या या विषयाच्या चर्चेने भरून वाहत आहेत. एका खटल्याच्या निमित्ताने बाहेर आलेल्या माहितीने कार कंपन्यांची झोप उडाली आहे. फोर्ड आणि जनरल मोटर्स स्मार्टफोन बनवणार आहेत असं जर कोणी म्हटलं तर लोक हसले असते. पण अॅपल कार बनवणार आहे असं जेव्हा काही लोक म्हणत आहेत तेव्हा मात्र सर्वांचे कान टवकारले आहेत. अॅपलने यापूर्वी कुठलाही संबंध नसलेल्या उद्योगात शिरुन ती बाजारपेठ काबीज केल्याची अनेक उदाहरणे आहेत. कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, डीजीटल म्युझिक, स्मार्टफोन, फोटोग्राफी अशा अनेक क्षेत्रात अॅपलने आपल्या क्रांतिकारी उत्पादनांनी पूर्ण बाजारपेठच बदलून टाकली आहे. आणि म्हणूनच वर्तमानपत्रे एवढी चर्चा करीत आहेत.

मॅसॅच्युसेटस् राज्यातील A123  या लिथियम आयॉन बॅटरी बनवणाऱ्या कंपनीने अलिकडेच अॅपलविरुद्ध खटला दाखल केला असून या खटल्यामध्ये अॅपल कंपनी आपल्या कंपनीच्या महत्वाच्या लोकांना जास्त पैसे देऊन ओढत असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेत अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर ‘नॉन कम्पीट अॅग्रीमेंट’  करतात. या करारानुसार कर्मचाऱ्यांना करार करणारी कंपनी सोडून त्या कंपनीशी स्पर्धा करणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी धरता येत नाही. तसेच एखादा माणूस अशा प्रकारे नोकरी सोडून गेला तर त्याला इतर माणसांना त्याच्याबरोबर नेता येत नाही.  A123 नुसार या कंपनीच्या पाच मोठ्या संशोधकांना अॅपलने या कराराच्या विरुद्ध जाऊन नोकरीवर ठेवले आहे. A123 नुसार अॅपल कंपनी मोठ्या प्रमाणावर बॅटरी उत्पादन करण्याची तयारी करत आहे. तसेच आपल्या कंपनीतील संशोधकांव्यतिरीक्त अॅपलने एल जी, सॅमसंग, पॅनासोनिक, तोशिबा आणि जॉन्सन कंट्रोल्स या कंपनीतीलही संशोधकांना अधिक पैसे देऊन आपल्याकडे ओढले आहे.  यापैकी मुजीब इजाज या संशोधकाने इतर चार संशोधकांना अॅपलकडे ओढल्याचा आरोपही त्यांनी ठेवला आहे. त्यामुळे मुजीबने स्पर्धक कंपनीकडे नोकरी करून व इतर कर्मचाऱ्यांना त्या कंपनीकडे ओढून कराराचा दोन वेळा भंग केला आहे असेही A123 ने म्हटले आहे.

सुप्रसिद्ध इलेक्ट्रीक कार बनवणाऱ्या कंपनी टेस्लाचा प्रमुख एलान मस्क यानेही ब्लूमबर्ग बिझनेसवीक मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अॅपल आपल्या कंपनीतील लोकांना तब्बल अडीच लक्ष डॉलर्सचा बोनस देऊन आपल्याकडे ओढत असल्याचे म्हटले आहे. या बोनसव्यतिरीक्त अॅपल त्यांना आपल्यापेक्षा ६० टक्के अधिक पगार देण्याची लालचही दाखवत आहे असेही त्यांनी म्हटले आहे.  टेस्लाने गेल्या वर्षी अॅपलच्या कंपनी विकत घेणाऱ्या विभागाबरोबर चर्चा केली हे आता उघड झाले आहे. ही चर्चा टेस्ला विकत घेण्यासाठी होती का हे अजून निश्चित झालेले नाही परंतु अॅपल कार उद्योगासंबंधित काहीतरी करत आहे या वृत्ताला यामुळे दुजोरा मिळतो.  ब्लूमबर्गमधील एका वृत्तानुसार अॅपलने कार उद्योगाशी संबंधित असलेल्या तब्बल २०० लोकांचा चमू बनवला आहे. या वृत्तानुसार २०२० पर्यंत ही कार बाजारात आणण्याचा अॅपलचा प्रयत्न राहणार आहे. परंतु या बातमीचा नक्की स्त्रोत त्यांनी जाहीर केलेला नाही. अॅपल कंपनीने या विषयावर कुठलीही प्रतिक्रीया देण्यास  नकार दिला आहे.

कार बनवणे हे काही सोपे काम नाही. नवीन कारची निर्मिती करायला खूप वेळ लागतो व प्रचंड पैसा लागतो. कार बनवण्याची क्षमता असलेला विभाग उभारायला अंदाजे एक अब्ज डॉलर्स खर्च येऊ शकतो असा एक सर्वसाधारण अंदाज आहे. परंतु अॅपलला पैशाची काहीच चणचण नाही. २०१४ च्या शेवटच्या तिमाहीत अॅपलला तब्बल १८ अब्ज डॉलर्सचा नफा झाला! तसेच या कंपनीकडे सध्या तब्बल १७८ अब्ज डॉलर्स पडून आहेत! अॅपलने मागील वर्षी नुसत्या संशोधनावर सुमारे ६ अब्ज डॉलर्स खर्च केले! अॅपलचा प्रश्न पैसे कसे मिळवायचे हा नसून ते कसे खर्च करायचे हा आहे! त्यामुळेच कार बनवण्याचा प्रकल्प हाती घ्यायची पूर्ण आर्थिक क्षमता अॅपलमध्ये आहे याबाबत जाणकारांमध्ये दुमत नाही.

कार उद्योग आणि तंत्रज्ञान उद्योग कधी नव्हे ते एकमेकांच्या जवळ येत आहेत. अलिकडे बाजारात मिळणाऱ्या कार खूप मोठ्या प्रमाणात संगणकीकृत असतात. या कारमधील अनेक कामे संगणकाद्वारे केली जातात. ब्रेक लावण्यापासून इंजिनमधील व्हॉल्वच्या टायमिंगपर्यंत अनेक गोष्टी संगणकाने नियंत्रित केलेल्या असतात. कार चालत असताना पुढे एखादी व्यक्ती अथवा वस्तू आली तर कारने आपोआप ब्रेक मारणे, पुढील कारच्या वेगानुसार आपला वेग कमीअधिक करणे, स्वत: पार्क करणे अशा अनेक तंत्रज्ञान सुविधा आजकालच्या कारमध्ये असतात. नवीन मिळणाऱ्या महागड्या कार इंटरनेटला जोडलेल्या असतात. तुमची कार सध्या कुठे आहे आणि ती चार्ज होते आहे की नाही हे तुम्हाला आता स्मार्टफोनवरून कळू शकते. स्मार्टफोनचा वापर करून कार लॉक अनलॉक करणे, स्मार्टफोनचा पडदा कारमधील पडद्यावर दिसणे अशा अनेक अभिनव सुविधा आता बाजारपेठेत यायला लागल्याल आहेत. खुद्द अॅपलनेच आपली कार सुविधा – कारप्ले सुविधा बाजारात आणली आहे. या सुविधेनुसार तुमच्या आयफोनमधील अनेक अॅपला कारच्या पडद्याद्वारे नियंत्रित करता येते. तसेच हे अॅप तुम्हाला कारच्या पडद्यावर पाहता येते. गुगलच्या अँड्रॉइडनेही अशीच सुविधा जाहिर केली आहे. दरवर्षीच्या जानेवारी महिन्यात लास व्हेगासमध्ये होणाऱ्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये गेल्या काही वर्षापासून कार कंपन्याही आपली हजेरी लावू लागल्या आहेत.  कार कंपन्या ज्याप्रमाणे दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आहेत त्याच प्रमाणे गुगलसारख्या तंत्रज्ञान कंपन्याही कार उद्योगात उतरल्या आहेत. गुगल स्वयंचलित कार बनवत आहे हे आता काही गुपित नाही. गुगलने आपली स्वयंचलित कार अनेक वेळा पत्रकारांना दाखवली आहे. एलान मस्कच्या सुप्रसिद्ध ‘टेस्ला’ कार कंपनीला कार कंपनी म्हणण्यापेक्षा तंत्रज्ञान कंपनी म्हणणेच जास्त संयुक्तीक ठरेल. आणि त्यामुळेच अॅपलने या उद्योगात उतरायचे ठरवले असले तर त्यात आश्चर्य आहे असे म्हणता येणार नाही. किंबहुना अनेक जाणकारांच्या मते ही अपेक्षितच चाल ठरेल.

अर्थातच अॅपल नक्की काय करते आहे ते कोणालाच माहित नाही. अॅपल कार बनवत नसावी असे म्हणणारेही काही जण आहेत. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक जेफ्री मिलर यांच्या मते अॅपल कंपनीला कार बनवण्यात रस नसावा. त्याऐवजी अॅपलची उत्पादने सर्व कारमध्ये वापरली जावीत यावर ते काम करत असावेत.  त्यांच्यामते ज्याप्रमाणे गुगल इतर कारउत्पादकांबरोबर मिळून स्वयंचलित कारची निर्मिती करत आहे त्याचप्रमाणे अॅपल इतर कार उत्पादकांबरोबर मिळून काहीतरी करत असावे. आणि अॅपल कारची निर्मिती करतही असले तरीही ती बाजारपेठेत येईलच याचा भरवसा नाही. मोठ्या कंपन्या एकावेळी अनेक वेगवेगळ्या उत्पादनावर काम करत असतात. त्यापैकी सर्वच उत्पादने बाजारपेठेत येत नाहीत. काही उत्पादने केवळ प्रयोग म्हणून बनवली जातात. त्या उत्पादनाचे प्रकल्प वेगवेगळ्या कारणाने अयशस्वी झाल्याने ही उत्पादने बाजारपेठेत येतच नाही.

अॅपल कार बनवत आहे या बातमीवर काही कार कंपन्यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. व्होल्कस्वॅगन या प्रसिद्ध जर्मन कार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टीन विंटरकॉर्न यांनी  “आम्हाला या नवीन स्पर्धकांमुळे फारसा फरक पडत नाही” असे म्हटले आहे.  “किंबहुना या स्पर्धकांमुळे आम्ही आमच्या कारमध्ये अधिकाधिक तंत्रज्ञान वापरायचा प्रयत्न करु” असेही त्यांनी म्हटले आहे. प्रसिद्ध केली ब्लू बुक कंपनीचे मॅट डोलेरोंझो यांनी अॅपलला कार बनवण्यासाठी कुठल्यातरी कार बनवणाऱ्या कंपनीबरोबर करार करावा लागले असे वाटते. किंबहुना अॅपलला पाच वर्षात कार बनवण्यासाठी चीनमध्ये कारचे उत्पादन करू शकणाऱ्या एखाद्या कंपनीबरोबर भागीदारी करावी लागेल असे त्यांनी म्हटले आहे. जनरल मोटर्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन एकरसन यांनी कार बनवणे अतिशय कठीण काम असून अॅपल सारख्या कंपनीने या फंदात पडू नये असे म्हटले आहे.

तंत्रज्ञानाने अनेक उद्योगामध्ये क्रांती घडवून आणली आहे. कार उद्योग आतापर्यंत त्यापासून वाचला होता, परंतु गुगल, अॅपल आणि टेस्लासारख्या कंपन्या फार काळ या उद्योगाला तसे राहू देणार नाहीत. कार उद्योगातील क्रांती फार लांब नाही एवढे मात्र नक्की!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s