मध्यमवर्गीयांसाठी क्लाउड

cloud-providers

क्लाउड कंप्युटींग या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या संदर्भात वेगळा आहे. परंतु सामान्य मध्यमवर्गीय लोकांना कदाचित माहित नसते कि दररोज ते अनेक वेळा त्यांच्या नकळत ‘क्लाउड’ वापरत असतात. तुमची माहिती इंटरनेटवरील सर्व्हरवर साठवून ठेवणाऱ्या सेवांना सर्वासाधारणपणे क्लाउड म्हटलं जातं. जीमेल, फेसबुक, गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स, फ्लिकर  अशी अनेक सेवांना  ‘क्लाउड’ सेवा असे म्हणता येईल.

पासवर्ड

आजकाल जवळजवळ सगळेच – विशेषत: सुशिक्षित मध्यमवर्ग ऑनलाईन बँकींगचा सर्रास वापर करतात. फेसबुक, जीमेल, वेगवेगळ्या बँकाच्या वेबसाइट, इन्शुरन्स कंपनीची वेबसाईट, फ्लिपकार्ट किंवा तत्सम खरेदी करण्याच्या साइट, क्विकर सारख्या गोष्टी विकण्याच्या साइट अशा अनेक साइटचे युझरनेम आणि पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. अनेक लोक एकच पासवर्ड सर्व वेबसाइटसाठी वापरण्याचा प्रयत्न करतात पण काही ठिकाणी पासर्वडचे नियम वेगळे असल्याने एकच पासवर्ड चालत नाही. तसेच काही वेबसाइट ठराविक कालाने पासवर्ड बदलायला लावत असल्याने तोच पासवर्ड वापरणे शक्य नसते. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सरासरी आठ ते दहा युझरनेम आणि पासर्वड लक्षात ठेवावे लागतात. आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक वेळा हे पासवर्ड घरातल्या दुसऱ्या कोणाला तरी माहित असणं आवश्यक असतं – विशेषत: बँक अकाउंटच्या बाबतीत जॉइंट अकाउंट नसेल तर हे खूपच महत्वाचं आहे. माझ्या माहितीमध्ये नवऱ्याचा अपघात झाला आणि हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी पैसे हवे आहेत पण नवऱ्याच्या बँक अकाउंटची काहीच माहिती नसल्याने बायकोला दुसरी व्यवस्था करायला लागल्याचं एक उदाहरण आहे.  क्लाउडमुळे ही गोष्ट खूपच सुकर होऊ शकते.  Lastpass.com, passpack.com सारख्या अनेक वेबसाइट तुम्हाला तुमच्या सर्व अकाउंटचे युझरनेम व पासवर्ड एका जागी साठवण्याची व्यवस्था उपलब्ध करून देतात. या वेबसाइटचा पासर्वड लक्षात ठेवला म्हणजे झाले! यातील काही वेबसाइटमुळे तर लॉगीन प्रक्रियाही अतिशय सोपी होऊ शकते. या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला आधी साठवून ठेवलेली कुठलीही वेबसाइट (उदा. बँकेची अथवा इन्सुरन्स कंपनीची) उघडता येते. एव्हढंच नव्हे तर त्या वेबसाइटमध्ये आपोआप लॉगीनही करता येते! त्यामुळे तुम्हाला पासवर्ड इकडे वाचून तिकडे घालण्याचाही त्रास वाचतो.  अनेक वेळा आपण लक्षात राहण्यासाठी म्हणून सोपा पासर्वड ठेवतो. परंतु पासवर्ड सोपा ठेवल्याने हॅकरचे काम सोपे होते. तुमच्या पासवर्डमध्ये एखादे कॅपिटल अक्षर, एखादे लहान अक्षर आणि काही किबोर्डवरील चिन्हे घातल्यास तो ओळखणे कठीण जाते. Lastpass.com, passpack.com सारख्या वेबसाइटमुळे पासवर्ड लक्षात ठेवायची गरज राहत नाही आणि त्यामुळे तुम्हाला कठीण पासवर्ड ठेवणे शक्य होते. तसेच ह्या वेबसाइट खास प्रकारचे एनक्रिप्शन वापरत असल्याने या वेबसाइट हॅक झाल्या तरी तुमचे पासवर्ड हॅकरना मिळण्याची शक्यता खूपच कमी असते.

फोटो

मोबाइल फोनमध्ये कॅमेरा आल्यापासून आपण सर्वच जण खूप मोठ्या प्रमाणात फोटो काढायला लागलो आहोत. परंतु अनेक मध्यमवर्गीय लोक आजकाल वर्षातून एकदा फोन बदलतात. फोन बदलला की हे सर्व फोटो त्याबरोबर जातात. ते जाऊ नयेत म्हणून क्लाउडवर अपलोड करून ठेवणे आवश्यक आहे. फोटोच्या प्रिंट काढून ते साठवायचा जमाना आता गेला आहे. तेवढी जागा आणि वेळही कोणाकडे नसतो. त्याच्या तुलनेत फोटो क्लाउडवर ठेवणे खूपच सोपे जाते. क्लाउडवर फोटो ठेवले की मग लॅपटॉप व फोन कितीही वेळा बदलला तरी चिंता करायला नको, तुमचे फोटो सुरक्षित राहतात. तसेच  फोटो हरवण्याची शक्यताही नसते. क्लाउडवर फोटो टॅग करता येत असल्याने फोटो शोधणेही सोपे जाते. तुमच्या घराला आग लागली, चोरी झाली तरीही फोटो गहाळ होण्याची शक्यता नाही. म्हणूनच सर्वसामान्य अमेरिकन मध्यमवर्ग आपले फोटो क्लाउडवर ठेवतो. तुमच्या कडे जुने फोटो प्रिंट स्वरुपात पडून असतील तर त्याचे डिजीटल स्वरूपात रुपांतर करून देण्याचाही अनेक सुविधा अमेरिकेत (व भारतातही) उपलब्ध आहेत. असे फोटो डिजीटल स्वरूपात क्लाउडवर साठवल्याने घरची भरपूर जागा वाचू शकते.  इंटरनेटवर अनेक फोटो साठवून ठेवणाऱ्या क्लाउड सेवा उपलब्ध आहेत. अनेक लोक फेसबुकचाही फोटो साठवण्यासाठी उपयोग करतात. परंतु फेसबुक फोटो साठवण्यासाठी सर्वात चांगला पर्याय नाही. तुम्ही जेव्हा फेसबुकवर फोटो अपलोड करता तेव्हा त्या फोटोचे रिझोल्यूशन कमी करून कमी दर्जाचा फोटो फेसबुक साठवून ठेवते. फोटो चांगल्या प्रतीच्या डिजीटल कॅमेराने काढले असतील तर ते तसेच्या तसे साठवून ठेवणे आवश्यक आहे. कमी प्रतीचे फोटो साठवून ठेवून त्यात बदल केल्यास ते पुन्हा सेव्ह करताना अजून कमी प्रतीचे होतात. म्हणून इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अनेक फोटो सेवा तुम्हाला तुमचे फोटो मूळ स्वरूपात साठवून ठेवण्याची सुविधा देतात. फ्लिकर, पिकासा ही अशा क्लाउड सेवांची उदाहरणे होत. फ्लिकर चक्क १ टेराबाइट जागा विनाशुल्क देते. एका टेराबाइटमध्ये अंदाजे २० लाख फोटो राहू शकतात! या वेबसाइटवरून तुम्ही आपले फोटो फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कवरही टाकू शकता. एकंदरीतच या सेवा फोटोसाठीच बनवल्या गेल्या असल्याने त्यामध्ये फेसबुकपेक्षा अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध असतात. अमेरिकेततर फ्लिकरवरून तुम्ही आपल्या फोटोच्या प्रिंटही (पैसे देऊन) मागवू शकता. जी गोष्ट फोटोची तीच गोष्ट व्हिडीओचीही आहे. अनेक फोटो साठवणाऱ्या सेवा व्हीडीओही साठवू देतात. माझ्या मते व्हिडीओ साठवण्याठी यु ट्यूब सर्वात चांगला पर्याय आहे. युट्यूबवर खाजगी व्हीडीओही साठवून ठेवता येतात. या सर्व सुविधांची मोबाइल अॅप येत असल्याने मोबाइलवरून फोटो अथवा व्हीडीओ अपलोड करणे खूपच सोपे जाते.

गुगल ड्राइव्ह

आपल्या घरी आपण अनेक महत्वाची कागदपत्रे असतात. पासपोर्ट, जागेची कागदपत्रे, बँकाची कागदपत्रे, इंशुरन्स पॉलिसी वगैरे वगैरे. हे सर्व कागद अनेक वेळा लोक बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. परंतु लॉकरमध्ये ठेवलेले कागदपत्र जेव्हा लागतील तेव्हा काढणे सोपे नसते. विशेषत: एखाद्या रविवारी तुम्हाला एखादा महत्वाचा कागद हवा असेल तर लक्षात ठेवून तो रविवारच्या आधी लॉकरमधून काढून ठेवावा लागतो. क्लाउडमुळे याही समस्येचे निराकरणे करणे सोपे आहे. आपली महत्वाची कागदपत्रे स्कॅन करून तुम्ही गुगल ड्राइव्हमध्ये साठवून ठेवू शकता. तुमच्या कडे जीमेल अकाऊंट असेल तर तुम्हाला गुगल ड्राइव्ह अकाउंट त्याबरोबर मुफ्त मिळते. गुगल ड्राइव्हचे मोबाइल अॅपही येत असल्याने तुम्ही ही कागदपत्रे मग मोबाइवरून कधीही पाहू शकता. तसेच हवे असतील तेव्हा डाऊनलोड करून प्रिंटही करू शकता. त्यामुळे घरील कागदपत्रे चोरीला गेली किंवा लॉकरमधील कागदपत्रे गहाळ झाली तरीही हरकत नाही, त्याची एक प्रत क्लाउडवर सुरक्षित असल्याने ही कागदपत्रे हवी असतील तेव्हा वापरता येतात. गुगल सर्वांना १५ गिगाबाइट जागा मुफ्त देते. या १५ गिगाबाइटमध्ये तुमच्या इमेल (जी मेल) , कागदपत्रे (ड्राइव्ह) आणि फोटो (पिकासा) ठेवता येतात. यापेक्षा जास्त जागा हवी असल्यास पैसे देऊन जास्त जागा विकत घेता येते. गुगलव्यतिरीक्त ड्रॉपबॉक्स नावाची कंपनीही अशा प्रकारची सेवा पुरवते. ह्या सेवेचा वापर करण्यासाठी घरी स्कॅनर असणे जरुरी आहेच असे नाही. आजकाल अनेक मोबाइल अॅप कॅमेराचा वापर करून कागदपत्रे स्कॅन करु देतात. त्यांनी स्कॅन करुन तयार झालेल्या चित्राची प्रत एखाद्या स्कॅनरइतकी चांगली नसली तरी ते कागदपत्र वाचण्याइतकी चांगली असते. त्यामुळे कामचलाऊ स्कॅनर म्हणून तुमच्या स्मार्टफोनचाही वापर करतो येतो.

क्लाउडवर कागदपत्रे ठेवण्याचे अनेक फायदे असले तरी एक महत्वाचा तोटाही आहे. तुमची महत्वाची कागदपत्रे हॅक होऊन नको त्या माणसांच्या हाती पडू शकतात. अशा प्रकारचे हॅक तुम्ही काळजी घेतली नाही म्हणूनही होऊ शकतात वा सॉफ्टवअर मधील चुकांमुळेही होऊ शकतात. अलिकडेच अनेक महत्वाच्या कंपन्यांचे सर्व्हर हॅक होऊन महत्वाची कागदपत्रे इंटरनेटवर जाहीर झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु यावरही एक उपाय आहे. स्कॅन केलेली कागदपत्रे पी डी एफ फाइलमध्ये साठवून ठेवून या फाइललाही पासवर्ड घालता येतो. म्हणजे आपले अकाउंट हॅक झाले तरीही त्या फाइल चोरांना उघडता येणार नाहीत. अर्थात यामुळे माहिती चोरी होण्याची शक्यता संपूर्णपणे टाळता आली नाही तरी बरीच कमी मात्र करता येते.

अमेरिकेत लोक क्लाउडचा उपयोग आपली गाणी साठवण्यासाठीही करतात. अॅपल, अॅमेझॉन आणि गुगलने अशा प्रकारच्या सेवा सुरु केल्या आहेत. त्यामुळे लोक आता सीडी खरेदी करायच्या फंदात न पडता गाणी आयट्यून्स अथवा अॅमेझॉनवरून विकत घेऊन क्लाउडमध्ये साठवून ऐकतात.

क्लाउड कंप्यूटींगची आता कुठे सुरुवात होत आहे. पुढे जाऊन काय काय क्लाउडवर साठवता येईल याची कल्पनाच न कलेली बरी!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s