मायक्रोसॉफ्ट होलोलेन्स

विंडोज १० पहायला मिळेल या आशेने अनेक मायक्रोसॉफ्ट चाहते व पत्रकार २१ जानेवारीच्या मायक्रोसॉफ्टने आयोजित केलेल्या समारंभाला गेले होते. परंतु या समारंभामध्ये विंडोज १० च्या ऐवजी लोकांचे लक्ष वेधून घेतले ते मायक्रॉसॉफ्टच्या नवीन निर्मितीने – ‘होलोलेन्स’ ने. होलोलेन्सबरोबर मायक्रोसॉफ्टने आभासी चश्म्याच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. परंतु होलोलेन्सहा सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या किंवा नजिकच्या काळात बाजारपेठेत उपलब्ध होणाऱ्या चश्म्यांपेक्षा बराच वेगळा आहे.

यापूर्वी मी या सदरातून ऑक्युलस व्ही आर या आभासी चश्म्याव्यतिरीक्त लिहीले आहे. या चश्म्याला तुम्ही घातलंत कि तुम्ही संपूर्णपणे एका आभासी जगात बुडून जाता. एका वेगळ्याच – व्हिडीओ गेमच्या जगात तुम्हाला हा चश्मा घेऊन जातो आणि त्या जगात तुम्ही वावरत आहात असा भास तुम्हाला होतो. परंतु मायक्रोसॉफ्ट होलोलेन्सचं मात्र तसं नाही. होलोलेन्स घातल्यावर तुम्हाला एखादा साधा चश्मा घातल्यानंतर समोरचे जे दृष्य दिसेल तेच दिसत राहते. परंतु या दृष्यामध्ये तुम्ही अनेक होलोग्राम घालू शकता. होलोग्रामला सोप्या भाषेत त्रिमीत (थ्रीडी) वस्तू असे म्हणता येईल. नरेंद्र मोदींच्या थ्रीडी सभांविषयी तुम्ही ऐकलं असेलच.  नरेंद्र मोदी प्रत्यक्षात एका शहरात एखाद्या सभेत बोलत असताना  दुसऱ्या शहरातील सभेत त्यांचा होलोग्राम लोकांना दिसत असे. त्यामुळे नरेंद्र मोदी आपल्यापुढे प्रत्यक्ष उभे राहून भाषण करत आहेत असे तेथील लोकांना वाटत असे. हा अनुभव एखाद्या पडद्यावर नुसते चित्र पाहण्यापेक्षा अधिक जिवंत वाटतो.  आपल्या समोरच्या वातावरणात अशा अनेक प्रकारचे होलोग्राम तुम्ही तयार करून या चश्म्याच्या मदतीने घालू शकता.  म्हणजे समजा तुमच्या पुढे एक टेबल आहे. तर या टेबलावर एखादी फुलदाणी कशी दिसेल हे फुलदाणीचा होलोग्राम त्या टेबलावर ठेवून तुम्ही पाहू शकता. समजा तुमच्या समोर भिंत आहे. या भिंतीवर तुम्ही टिव्हीचा होलोग्राम पाहून चक्क टिव्ही पाहू शकता! एखादा अभियंता एखादी मोटरसायकल डिझाईन करत आहे. त्याला त्या मोटरसायकलची सीट सध्याच्या सीटपेक्षा वेगळी डिझाईन करून कशी दिसते हे पहायचे आहे. हा अभियंता होलोलेन्स घालून मोटरसायकलपुढे उभा राहून त्यावर नवीन सीटचा होलोग्राम बसवून ती सीट कशी दिसेल ते पाहू शकतो! होलोलेन्सचे प्रात्यक्षिक पाहताना न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकाराला आलेला अनुभव यापेक्षाही रंजक आहे. त्याला होलोलेन्समधून समोर असलेले खरेखुरे टेबल दिसत होते. या पत्रकाराने होलोलेन्समधून एक हातोड्याचा होलोग्राम उचलला आणि त्या हातोड्याने टेबलावर जोरजोरात मारायला सुरुवात केली. आणि आश्चर्यम्हणजे होलोलेन्समध्ये ते टेबल चक्क जसे खऱ्या हातोड्याने वार केल्यावर टेबल तुटेल तसे तुटलेले त्याला दिसेल! एखाद्या डिजीटल वस्तूचा वापर करून प्रत्यक्षातील वस्तू बदलून कशी दिसू शकते याचे यापेक्षा जास्त चांगले प्रात्यक्षिक नाही.

या चश्म्यातून दिसणारे थ्री डी होलोग्राम अर्थातच तुम्हाला तयार करावे लागतात. त्यासाठी मायक्रोसॉफ्टने खास होलो स्टुडीओ नावाचे सॉफ्टवेअर बनवले आहे. हे सॉफ्टवेअर तुम्हाला त्रिमित वस्तू बनवायला मदत करते. या सॉफ्टवेअरची तुलना इतर कुठल्याही थ्री डी स्टुडीओशी करता येईल. या स्टुडीओमध्ये अनेक साध्या नेहमीच्या वापरात लागणाऱ्या त्रिमित वस्तू आधीच बनवलेल्या असतात.  या वस्तू एकमेकांना जोडून आणि त्यांचा आकार बदलून तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या त्रिमित गोष्टी बनवू शकता.  होलो स्टुडीओ तुम्हाला हा चश्मा घालून वापरता येतो. मायक्रोसॉफ्टने २१ जानेवारीच्या समारंभात हा स्टुडीओ वापरुन त्रिमित होलोग्राम बनवणे किती सोपे आहे याचे प्रात्यक्षिक लोकांना दाखवले.

स्किईंग करताना ज्या प्रकारचा चश्मा घालतो त्या चश्म्याप्रमाणे होलोलेन्स दिसते. गुगल ग्लासपेक्षा हा चश्मा बराच मोठा आहे. या चश्म्याला एक कॅमेराही जोडलेला आहे. या कॅमेराचा वापर करून तुम्ही इतर लोकांशी स्काइपवर बोलू शकता. होलोलेन्सला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर जोडलेले आहेत. हे सेन्सर वापरून हा चश्मा तुमच्या हालचाली ओळखतो. होलोलेन्सशी तुम्ही दोन प्रकारे संवाद साधू शकता – एक हातवारे करून व दुसरा बोलून. सध्या फक्त हाताच्या बोटाने क्लिक करायची सुविधा होलोलेन्समध्ये आहे. परंतु भविष्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे हातवारे होलोलेन्स ओळखू शकेल. या चश्म्यात मायक्रोसॉफ्टने एक खास ‘होलोग्राफिक प्रोसेसिंग युनिट’ चिप घातली आहे. यातून दिसणाऱ्या होलोग्रामचे रिझोल्यूशन तितके चांगले नसले तरीही ते होलोग्राम खरे वाटण्याइतपत नक्कीच चागले आहे.

होलोलेन्सची गुगल ग्लासशी व ऑक्युलस व्ही आरशी तुलना होणे साहजिकच आहे. ऑक्युलस व्ही आर चे उद्दीष्ट वेगळे असल्याने या चश्म्याची तुलना गुगल ग्लासशी करणे जास्त संयुक्तीक ठरेल. या चश्म्यातील सुविधांपुढी गुगल ग्लास अगदीच फिके ठरते. गुगल ग्लासचे म्हणजे एकप्रकारे डोळ्यावर घालायचा फोन आहे. एखाद्या फोनमध्ये जेवढ्या सुविधा असतात तेवढ्या सुविधा तुम्हाला गुगल ग्लासमध्ये मिळतात. परंतु होलोलेन्समध्ये मात्र होलोग्राम दिसण्याची सुविधा असल्याने हा चश्मा गुगल ग्लासपेक्षा एका वेगळ्याच पातळीवर जातो. तसेच गुगल ग्लासची रचना तुम्हाला नेहमीचे काम करताना संगणकाचा पडदा दिसण्यासाठी केलेली आहे. उजव्या बाजूला एका कोपऱ्यात तुम्हाला संगणकाचा पडदा दिसतो. परंतु होलोलेन्सची रचना मात्र त्यात समरसून काम करण्यासाठी केलेली आहे.

मायक्रोसॉफ्ट होलोलेन्सवर पाच वर्षापासून काम करत आहे. किबंहुना सात वर्षापासून असेही म्हणायला हरकत नाही. सात वर्षापूर्वी अलेक्स किपमननी त्याची संकल्पना मायक्रोसॉफ्टपुढे मांडली. त्या संकल्पनेचे पुढे मायक्रोसॉफ्ट किनेक्टमध्ये रुपांतर झाले.  नोव्हेंबर २०१० मध्ये किनेक्ट एक्सबॉक्स या मायक्रॉसॉफ्टच्या गेमिंग कन्सोलबरोबर बाजारपेठेत आले. किनेक्ट लोकांचे हातवारे ओळखते आणि त्याप्रमाणे संगणकाला आज्ञा देते. होलोलेन्सही हातवारे ओळखू शकते. त्यानंतर ‘बराबू’ या सांकेतिक नावाने होलोलेन्स प्रकल्पाचा मायक्रोसॉफ्टमध्ये जन्म झाला. ‘आतापर्यंत तुम्ही किबोर्ड आणि माऊसने संगणकाशी बोलत होतात. परंतु भविष्यात तुम्ही आपला आवाज व हातवारे करून संगणकाशी बोलाल.’ अलेक्स किपमननी वायर्ड मगेझिनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यांच्या मते भविष्यात संगणकाशी बोलण्यासाठी तुम्ही इतर माणसांशी बोलण्यासाठी जे जे करावे लागते तेच करावे लागेल. त्यासाठी किबोर्ड व माउस सारख्या वेगळ्या गोष्टींची गरज नाही.

तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुतेकांनी होलोलेन्सचे स्वागतच नव्हे तर कौतुकही केले आहे. ‘गिझमोडो’  च्या शॉन होलीस्टर यांनी एक अतिशय उत्तम अनुभव म्हणून होलोलेन्सचे कौतुक केले आहे. ‘सीनेट’ च्या निक स्टॅटनी ‘ऑगमेंटेड रिएलीटीचा प्रत्यक्षात वापर करण्यासारखा उपयोग’ अशा शब्दात कौतुक केले आहे.  न्यू यॉर्क टाईम्सच्या फरहाद मंजू यांनी होलोलेन्सचे वर्णन ‘गुगल ग्लासच्या तुलनेत उपयोगी’  असे केले आहे. वायर्ड मॅगेझिननेही होलोलेन्सवर दोन लेख लिहून होलोलेन्सचे स्वागतच केले आहे.

परंतु गुगलने जेव्हा गुगल ग्लास जाहिर केला तेव्हाही अमेरिकन प्रसारमाध्यमांनी त्याला उचलून धरले होते. या उत्पादनांमुळे संगणकाचे विश्व बदलेल अशी भाकिते केली गेली. परंतु आज काही वर्षांनी संगणकीय विश्वात गुगल ग्लासमुळे काही फारसा बदल आणवून घडलेला दिसत नाही.  सुमारे १०,००० गुगल ग्लास डेव्हलपर्सना विकल्यानंतर सामान्य माणसांचा १५०० डॉलर्स मोजून हे खेळणे विकत घेण्याकडे कल नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.   रॉयटर्सच्या एका पत्रकाराने गुगल ग्लाससाठी अॅप तयार करणाऱ्या सोळा डेव्हलपरना शोधून काढले. त्यातील ९ डेव्हलपर्सनी गुगल ग्लास अॅप बनवणे बंद केले आहे असे त्याला आढळून आले. आणि म्हणूनच की काय अलिकडेच गुगलने अधिक गुगल ग्लास विकणे बंद केले. एव्हढेच नव्हे तर हा संपूर्ण प्रकल्प आपल्या गुगल एक्स नावाच्या संशोधन विभागातून काढून ‘नेस्ट’ बनवणाऱ्या टोनी फडेल यांच्या हाती दिला आहे. एकंदरीत गुगल ग्लासचे भविष्य अनिश्चित आहे.

मायक्रोसॉफ्ट होलोलेन्सची अशी गत होऊ नये एव्हढीच माझी सदिच्छा!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s