कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो २०१५

CES-logoदरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लास व्हेगासमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो हे प्रदर्शन भरते. या प्रदर्शनात तंत्रज्ञान जगतातल्या कंपन्या आपली नवनवीन उत्पादने लोकांना दाखवण्यासाठी ठेवतात. ज्या लोकांना इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटमध्ये रस असतो अशा लोकांसाठी या प्रदर्शनाचे महत्व मक्केच्या वारीइतकंच मोठं असतं. या वर्षीच्या प्रदर्शनातील काही ठळक उत्पादने आपल्यापुढे आणायचा प्रयत्न केला आहे.

कार तंत्रज्ञान

गेल्या काही वर्षापासून इलेक्ट्रॉनिक्स शो मध्ये अत्याधुनिक संगणक नियंत्रित कार अनेक कार कंपन्या दाखवायला ठेवतात. किंबहुना आता लोक उत्सुकतेने अत्याधुनिक कार पाहण्यासाठी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोची वाट पाहतात. या वर्षीच्या प्रदर्शनात चक्क १० कार कंपन्यांनी आपल्या अत्याधुनिक कार प्रदर्शनात मांडल्या होत्या.  ऑडीने भविष्यातील कारमधील डिस्प्ले कसा असेल त्याची झलक पहायला दिली. कारमध्ये जिथे स्पीडोमीटर असतो त्या जागी या कारमध्ये पडदा असून स्पीडोमीटर या पडद्यावर दिसतो. स्पीडोमीटर बंद करून त्याऐवजी जीपीएसही याच पडद्यावर आपल्याला पहायला मिळू शकते. जीपीएसच्या ऐवजी इतर गोष्टी – एन्टरटेनमेंट सिस्टीमही याच पडद्यावर दिसू शकते. अलिकडे बाजारात आलेल्या कारमध्ये सर्वसाधारणत: दोन पडदे असतात – एक स्पीडोमीटर दिसतो तो व दुसरा डॅशबोर्डच्या मध्ये जी पी एस व एन्टरटेनमेंट सिस्टीमसाठी असतो तो. परंतु या कारमध्ये डॅशबोर्डच्या मध्ये असलेल्या पडद्याला डच्चू देऊन दोन्ही पडद्यांचे काम स्पीडोमीटरच्या पडद्याद्वारे करून घेतले आहे. याचा फायदा म्हणजे कार चालकाला दोन ठिकाणी पहायची आवश्यकता नाही – स्टीअरींग व्हीलच्या पाठीच त्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी दिसू शकतात. ऑडीने अशा प्रकारच्या डिस्प्लेला ‘व्हर्च्युअल कॉकपिट’ असे नाव दिले आहे. त्या व्यतिरीक्ट बी एम डब्ल्यू या जर्मन कार कंपनीने आपली i3 ही कार स्वत:हून – कुठल्याही मानवी मदतीशिवाय – पार्किंगसाठीची जागा शोधून पार्क करून शकते याचे प्रात्यक्षिक लोकांना दाखवले. ह्युंडाय आणि व्होल्कस्वॅगन या कंपन्यांनीही आपल्या स्वत: पार्क करू शकणाऱ्या गाड्या दाखवल्या. ह्युंडायने स्मार्ट वॉच वापरून गाडी सुरु करण्याचेही प्रात्यक्षिक दाखवले. परंतु या सर्वांपेक्षाही लोकांचे विशेष लक्ष वेधून घेतले ते  मर्सिडीजने या प्रदर्शनात ठेवलेल्या नवीन कारने. मर्सिडीजने आपली F 015 नावाची स्वयंचलित कार या प्रदर्शनात जगाला सर्वप्रथम दाखवली. या कारमधील पुढील दोन सीट चक्क पूर्णपणे मागे वळतात. म्हणजे ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूला बसलेली व्यक्ती पुढे न पाहता मागे बसलेल्यांच्या समोर येऊन त्यांच्याशी गप्पा मारु शकतात!  कार स्वत:ला चालवू शकत असल्याने ड्रायव्हरला पुढे पाहण्याची आवश्यकता नाही! या कारमध्ये एक खास आय ट्रॅकींग सेन्सरही बसवलेला आहे. तुम्हाला रेडीओ लावायचा असेल तर फक्त डॅशबोर्डवरील रेडीओ आयकॉनकडे तुम्ही पहायचं! तुम्हाला रेडीओ लावायचा आहे हे कारला कळतं आणि कार रेडीओ सुरु करते! या गाडीमध्ये एक दोन नसून चक्त सहा डिस्प्ले आहेत! हे डिस्प्ले कारच्या दरवाजाच्या आतल्या बाजूला बसवलेले आहेत. तुम्ही हाताच्या हालचाली करून अथवा डिस्प्लेला स्मार्टफोनप्रमाणे हात लावून ते वापरु शकता. तसेच ह्या गाडीत पेट्रोल इंजिन नसून ती फ्युएल सेलवर चालते. एकदा इंधन (बहुधा हायड्रोजन) भरले की ही कार तब्बल १,१०० किलोमीटर पुन्हा इंधन भरल्याविना जाऊ शकते! मर्सिडीजची ही कार फक्त संकल्पना कार (कॉन्सेप्ट कार) असून ती प्रत्यक्ष बाजारात कधी येईल हे सांगता येत नाही. परंतु २०३० च्या आसपास अशा गाड्या बाजारात आल्या तर नवल वाटायला नको!

वैयक्तिक वाहने

या प्रदर्शनात अनेक अभिनव गोष्टी होत्या. त्यातील एक म्हणजे आयो हॉक – माणसांना वाहून नेणारी छोटासा स्केटबोर्ड! या स्केटबोर्डवर फक्त दोन पाय रोवायलाच जागा आहे. परंतु यावर उभा राहिल्यावर त्यातील इलेक्ट्रीक मोटर सुरु होऊन तो आपोआप पुढे जायला लागतो! अमेरिकेत प्रदूषण करणाऱ्या कारऐवजी लहानशी अंतरावर जाण्यासाठी इलेक्ट्रीक मोटरवर चालणाऱ्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांना बाजारपेठेत आणायचे प्रयत्न सुरु आहेत. काही वर्षापूर्वी सेगवे नावाचे असेच उपकरण बाजारात आले. त्याला दोन चाके व एक हँडलबार होता. सेगवेवर उभे राहिले आणि बॅलन्स साधला की ते आपोआपच सुरु होऊन पुढे जात असे. परंतु सेगवे लोकप्रिय झाले नाही. फारच थोड्या ठिकाणी सेगवे आज वापरात आहे. आयो हॉकने हा सेगवेप्रमाणे जवळच्या अंतरावर जाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सेगवेपेक्षा लहान आणि स्वस्त पर्याय उपलब्ध करून देण्यात आयो हॉकला यश मिळाले आहे. आयोहॉकमध्ये  हँडलबार नाही. परंतु सेगवेप्रमाणेच यावर उभे राहून बॅलन्स साधला की हा स्केटबोर्ड पुढे जायला लागतो. जवळ जवळ ताशी दहा किलोमीटर वेगाने हा स्केटबोर्ड चालू शकतो. एका चार्जमध्ये १४ ते १९ किलोमीटर अंतर हे उपकरण कापू शकते. म्हणजे तुम्हाला ४/५ किलोमीटर अंतरावर जाऊन परत यायचे असेल तर हा प्रदूषण न करणारा  व सायकलीपेक्षा खूपच कमी काम करायला लावणारा हा पर्याय आहे.

रोबोटीक्स

जपानमध्ये रोबोटीक्समध्ये खूपच मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे. अनेक जपानी कंपन्या वेगवेगळ्या प्रकाराचे रोबो बनवत आहेत. जगप्रसिद्ध कंपनी तोशिबाने या प्रदर्शनात आपला चिहीरा आयको नावाचा रोबो लोकांना दाखवायला ठेवला होता. हा रोबो एका ३२ वर्षीय मुलीच्या रुपात आपल्याला दिसतो. ह्या रोबोची रचना बोलण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी केली गेली आहे. जपानमध्ये वयस्कर लोकांना कंपनी द्यायला म्हणून याचा वापर केला जाणार आहे. हा रोबो गाणे गाऊ शकतो आणि तुमच्याशी जपानी आणि इंग्रजी भाषात बोलूही शकतो. ह्या रोबोला खाणाखुणांची भाषाही येते. हा रोबो दु:खी होतो, हसतो आणि रडूही शकतो! ४३ न्यूमॅटीक अॅक्चुएटर वापरून हा रोबो वेगवेगळ्या हालचाली करु शकतो.  यो रोबोच्या हालचाली, डोळे आणि चेहऱ्यावरील भाव आतापर्यंतच्या रोबोमध्ये सर्वात जास्त मानवीय आहेत. हा रोबो वयस्कर लोकांशी गप्पा मारण्याव्यतिरीक्त भविष्यात नर्स व वेटरचेही काम करू शकेल.

वेअरेबल उपकरणे

वेअरेबल उपकरणांमध्ये विशेष म्हणजे या प्रदर्शनात एमियोटा नावाच्या फ्रेंच कंपनीने आपला ‘बेल्टी’ पट्टा ठेवला होता. हा पट्टा आपोआपच घट्ट अथवा सैल होतो. तुम्ही बसल्यावर तो आपोआप सैल होतो व उभे राहिल्यावर तो आपोआप घट्ट होतो! एव्हढेच नव्हे तर तो घातल्यावर तुमची कंबर मोजतो. तुमच्या हालचालींचीही नोंद ठेवतो. एखादा फिटनेस ट्रॅकर ज्या गोष्टी मोजू शकतो त्या गोष्टी ही पट्टा मोजतो. तुम्ही जास्त वेळ बसला असाल किंवा कुठलीही हालचाल केली नसेल तर हा पट्टा तुम्हाला हालचाल करायची आठवण  टॅक्टाइल फिडबॅकने करून देऊ शकतो!  या पट्ट्याबरोबर इतर फिटनेस ट्रॅकरप्रमाणे स्मार्टफोन अॅप येते. ब्लूटूथ तंत्रज्ञान वापरून हा पट्टा तुमच्या स्मार्टफोनमधील या अॅपशी बोलू शकतो . या स्मार्टफोन अॅपमध्ये तुमच्या कंबरेचे मोजमाप आणि तुमच्या हालचालींचे आलेख तुम्हाला पहायला मिळू शकतात. या पट्‌ट्याव्यतिरीक्त वेअरेबल भागात अनेक स्मार्टवॉच गार्मिन, अल्काटेल, सोनी, लेनोवो इत्यादी कंपन्यांनी ठेवलेली होती.  स्मार्ट वॉच बनवणाऱ्या कंपन्यांचे कार कंपन्यांबरोबर झालेले मिलनही या प्रदर्शनात पहायला मिळाले. एल जी ने आपल्या स्मार्टवॉचच्या सहाय्याने ऑडी गाडी सुरु करून दाखविली. मिसफीट व दागिने बनवणाऱ्या सुप्रसिद्ध स्वरोव्हस्की कंपनीने आपला दागिन्यासारखा दिसणारा फिटनेस ट्रकरही या प्रदर्शनात मांडला होता. एकंदरीत या प्रदर्शनात वेअरेबल उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आढळून आली. अनेक नवनवीन कंपन्या या क्षेत्रात उतरल्याचे दिसून आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s