उबरच्या अडचणी

uber-logo२०१४ हे वर्ष उबरला थोडंसं अडचणीचाच गेलं. जगभरातील अनेक शहरात काही ना काही घटना घडल्यामुळे उबरवर बंदी आली. परंतु उबरला वेगवेगळ्या देशात झेलायला लागणारी आव्हाने दिल्ली प्रकरणापेक्षा वेगळी आहेत.

उबरवर जगातील अनेक शहरात तात्पुरत्या स्वरुपाची बंदीही आलेली आहे. परंतु अशा प्रकारची बंदी ही टॅक्सीवाल्यांच्या असोसिएशनने कोर्टात घातलेल्या दाव्यातून आलेल्या आहेत. टॅक्सीवाल्यांच्या पोटावर पाय आल्याने जगातील जवळजवळ प्रत्येक शहरात उबरला टॅक्सीवाल्यांच्या रोषांचा सामना करावा लागत आहे. अलिकडेच स्पेनमधिल एका कोर्टाने उबरला संपूर्ण देशभरामध्ये आपली सेवा देण्यावर बंदी घातली. उबर ड्रायव्हरना टॅक्सीवाल्यांना ज्या कायद्यांचे पालन करावे लागते अशा कायद्यांचे पालन करावे लागत नाही आणि त्यामुळे अशा कायद्याचे पालन न करता प्रवाशांना नेण्याआणण्याची सेवा देणे चुकीचे आहे असे कोर्टाने म्हटले आहे.  अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील पोर्टलंड शहरात उबरला अजूनही परवानगी मिळत नाहीए. त्यांना अनेक महिने स्थानिक सरकरशी वाटाघाटी केल्यांनतरही सरकारने उबरला सेवेची परवानगी देण्यास नकार दिला. अखेर लोकाग्रहास्तवर उबरने आपली सेवा चालू केलीच. पोटर्लंड सिटी (म्युनिसिपालटीला अमेरिकेत ‘सिटी’ असे म्हणतात) या विरुद्ध कोर्टात गेली असून त्यांनी कोर्टाला उबरची सेवा बंद  करण्याची विनंती केली आहे. ब्राझीलच्या रिओ द जानीरो शहरातही उबर सेवेला बेकायदेशीर ठरवण्यात आले असून उबरवर बंदी घालण्यात आली आहे. हॉलंडमध्येही अशाच प्रकरचा बंदी उबरवर घालण्यात आली आहे. भारतामध्येही सुरुवातीला रिझर्व बँकेचे नियम तोडल्यामुळे उबरवर भारतात बंदी येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. रिझर्व बँकेच्या नियमानुसार प्रत्येक ऑनलाइन क्रेडीट कार्ड व्यवहारासाठी तुमची पिन वापरणे आवश्यक आहे. क्रेडीट कार्डाच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी हा नियम केलेला आहे. परंतु उबर भारताबाहेरील पेमंट गेटवे वापरून क्रेडीट कार्डाचे व्यवहार करत असल्याने अशा प्रकारची पिन वापरण्याची उबरच्या गिऱ्हाइकांना गरज पडत नसे. परंतु रिझर्व बँकेने अजूनही या प्रकरणी निर्णय घेतलेला नाही.

अमेरिकेत कॅलिफोर्नियात मात्र एका वर्षापूर्वी एक गंभीर घटना घडली. २०१३ च्या ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी उबरच्या एका गाडीखाली येऊन सोफिया लू या ६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सोफियाचा भाऊ आणि आईही या घटनेमध्ये जखमी झाले. उपचाराअंती ते पूर्ण बरे झाले असले तरी ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याने या घटनेला मोठी प्रसिद्धी मिळाली. उबरने या घटनेशी आपला संबंध नसल्याचे सांगितले आहे. ज्यावेळी हा ड्रायव्हर गाडी चालवत होता तेव्हा त्या गाडीत उबर प्रवाशी नसल्याने ती कार ही इतर सर्वसामान्य कार प्रमाणेच आहे आणि त्याच्याशी आपला संबंध नाही असे उबरने म्हटले आहे. सोफियाच्या नातेवाइकांनी मात्र तो ड्रायव्हर उबरच्या मोबाइल फोनकडे पहात होता आणि म्हणून त्याला ही मुलगी दिसली नाही असे म्हटले आहे. त्यांनी उबरविरुद्ध नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. महत्वाची गोष्ट अशी की या घटनेनंतर लगेचच उबरबर बंदी आणा असे कुणीही म्हटले नाही. पण त्याऐवजी कॅलिफोर्निया सरकारने अलिकडेच एक विधेयक पारीत करून उबर ड्रायव्हरना खास विमा घेण्याची सक्ती केली आहे. अशा घटनांमध्ये विमा कंपनी नुकसानभरपाई देऊ शकेल. उबरलाही ड्रायव्हरना विशेष विमा पुरवण्याची जबाबदारी  टाकण्यात आली आहे. १ जुलै २०१५ पासून अशा प्रकारचा विमा सक्तीचा करण्यात आला आहे.

अमेरिकेत अशा प्रकारच्या घटना घडूनही उबरच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणावर जनमत नाही. किंबहुना उबरचा वापर वाढतोच आहे. उबर अधिकाधिक लोकप्रिय किंवा सर्वमान्य होत आहे. लोकांच्या दबावाखाली अनेक शहरांनी व राज्यांनी आपआपल्या कायद्यात आवश्यक ते बदल करून उबरला आवश्यक असलेल्या परवानग्या उपलब्ध करून दिल्या आहेत. अमेरिकेतील टॅक्सीचालकांनीही उबरविरुद्ध अनेक वेळा निर्दर्शने केली, राजकारण्यांकडेही धाव घेतली. पण तरीही येथील लोक उबरच्या पाठी भक्कमपुढे उभे राहिले. आणि याचे मुख्य कारण म्हणजे उबर वापरणे अमेरिकेत टॅक्सीपेक्षा खूपच जास्त सोयीस्कर तर आहेच, पण स्वस्तही आहे. अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क या दोन शहरांचा अपवाद वगळल्यास कुठेही टॅक्सी रस्त्यावर सहज थांबवून मिळवत नाही. तुम्ही डाऊनटाऊन भागात असाल तर कदाचित शक्य आहे नाहीतर टॅक्सी मिळवण्यासाठी तुम्हाला टॅक्सी कंपनीला फोन करणे आवश्यक असते. फोनवर मग तुम्ही कुठे आहात याचा पत्ता तुम्हाला कसरत करत सांगणे आवश्यक असते. आणि एव्हढे करून टॅक्सी येणार कधी – ४५ मिनीटांनी! हे टॅक्सीवालेही उर्मट असतात. नीट बोलत नाहीत. अनेक टॅक्सीवाले क्रेडीट कार्ड अाजकाल स्वीकारतात, पण रडत-खडत. आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे अमेरिकेत टॅक्सीवाल्यांना टिप द्यावी लागते! म्हणजे एखाद दोन डॉलर्स वर जास्त द्यावे लागतात. आता याची तुलना उबरशी करुन पहा. तुम्ही नुसते उबर अँप उघडायचे. ते आपोआपच  जी पा एस च्या सहाय्याने तुम्ही कुठे आहात हे ओळखते आणि तुम्हाला दाखवते. तो पत्ता थोडासा चुकला असेल तर तुम्हाला दुरुस्त करता येतो. त्यानंतर एक बटन दाबलेत की तुमचे काम झाले! जवळ असणारी कुठली उबर तुमच्याकडे येत आहे हे लगेच तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये दिसते. एव्हढेच नव्हे तर ती कार नक्की कुठली कार आहे, त्याच्या ड्रायव्हरचा फोटो आणि ती कुठल्या रस्त्यावरून तुमच्याकडे येत आहे हे सर्व तुम्हाला या अँपमध्ये दिसते.  बरं तुम्हाला एखादी विशिष्ट प्रकारची कार हवी असेल तर तेही तुम्हाला या अॅपच्या मदतीने निवडता येते. तुम्ही ४ पेक्षा अधिक जण असाल आणि तुम्हाला मोठी व्हॅन हवी असेल तर बटन दाबून तुम्ही मोठी व्हॅन निवडू शकता.  त्याव्यतिरीक्त  तुम्हाला या ड्रायव्हरशी फोन करून मी अमुक दुकानाजवळ उभा आहे असे सांगायचे असेल तरी हरकत नाही, ड्रायव्हरला फोन करण्याचे बटनही या अॅपमध्ये असते. आणि तुम्ही कारमध्ये बसलात की कॅश असायची गरज नाही. टीप द्यायचीही गरज नाही! आणि या सर्वावर कडी म्हणजे सर्वसाधारणत: उबर आणि लिफ्टमध्ये काम करणारे ड्रायव्हर हे ‘टॅक्सी ड्रायव्हर’ जमातीते नसून सर्वासाधारण सामान्य मध्यमवर्गीय लोक असतात. गेल्या आठवड्यात मला मिळालेला ड्रायव्हर हा चक्क तिसऱ्या वर्षाचा वैद्यकीय विद्यार्थी होता. तो थोडेसे पैसे जोडण्यासाठी म्हणून रात्री व वीकएंडला लिफ्ट चालवत होता. लॉस एंजलिस भागात अनेक लोक चित्रपट उद्योगात आपलं नशीब अाजमवायला येतात. यातील अनेक लोक दिवसा या स्टुडीयोतून त्या स्टूडीयोत ऑडीशन देत फिरतात व रात्री व वीकएंडला उबर किंवा लिफ्ट चालवतात. अनेक मुलींनाही मी उबर आणि लिफ्ट चालवताना लॉस एंजलीसमध्ये पाहिलेलं आहे. आणि हे सर्व ड्रायव्हर सर्वसामान्य असल्याने ते उर्मट नसतात. त्यामुळे आपला प्रवास सुखकर होतो.  तसेच प्रत्येक प्रवाशी ड्रायव्हरला एक ते पाच स्टारपैकी रेटींग देऊ शकतो. त्यामुळे एकादा ड्रायव्हर अनेक लोकांशी वाईट वागत असेल तर त्याचे रेटींग खराब होईल व उबरला अशा ड्रायव्हरला काढून टाकणे सोपे होईल. त्यामुले ड्रायव्हरला प्रवाशांशी चांगले वागावेच लागते.

उबरची आर्थिक परिस्थितीही उबरच्या लोकप्रियतेची पावती देते. उबर कंपनीची सध्याचे अमेरिकन बाजारपेठेतील मूल्यांकन तब्बल ४० अब्ज डॉलर्स एव्हढे आहे. उबरने नुकतेच या मुल्यांकनावर तब्बर १.२ अब्ज डॉलर्स बाजारपेठेतून उभे केले. जगातील तब्बल २५० शहरांमध्ये उबरने एव्हाना आपले हातपाय पसरले आहेत. दर आढवड्याला अनेक लक्ष डॉलर्सची उलाढाल उबर करत आहे. त्यामुळे  अशा प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उबरकडे पुरेसे पैसे आहेत यात कोणालाच शंका नाही.

खरंतर उबर ही कुठल्याही टॅक्सीपेक्षा जास्त सुरक्षित आहे असेच म्हणावे लागेल. प्रवाशी घेऊन जात असलेली टॅक्सी कुठे कुठे जाते हे जी पी एस वरून ट्रॅक केले जात नाही. परंतु प्रत्येक उबरने आपले अॅप चालू केले की ती कार कुठे कुठे जात आहे हे जी पी एस चा वापर करून ट्रॅक केले जाते. त्यामुळे कोर्टात ड्रायव्हर एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी घेऊन गेला होता हे सिद्ध करणे शक्य होते. एखाद्या टॅक्सी चालकाची टॅक्सी चालवण्याचा परवाना देण्याआधी जितकी कसून चौकशी केली जाते तेवढीत चौकशी जर उबरने केली तर उबर हे टॅक्सीपेक्षा नक्कीच सुरक्षित आहे असे म्हणावे लागले. वेगवेगळ्या देशात उबर अशा प्रकारच्या चौकशीसाठी वेगवेगळे उपाय वापरत असल्याने याचे एक उत्तर देता येत नाही. अमेरिकेतच उबर Hirease या कंपनीला ड्रायव्हरचे बॅकग्राउंड चेक करण्यासाठी वापरते. उबरच्या मतानुसार ही तपासणी अधिक चांगली आहे. परंतु जाणकारांमध्ये याबद्दल मतभेद आढळतात. काही जाणकारांमते ही तपासणी ही बहुतेक टॅक्सी चालकांना सामोरे जाव्या लागणाऱ्या ’लाइव्ह स्कॅन’ तपासणी एवढी चांगली नाही. उबर भारतात करत असलेली तपासणी चांगली नव्हती हे आता दिल्ली प्रकरणावरुन स्पष्ट झाले आहे. कंपनीने भारतातील आपल्या ड्रायव्हर तपासणी प्रक्रियेत सुधारणा करण्याचा मानस स्पष्ट केला आहे.

भारतामध्ये घातली गेलेली बंदी लवकरच उठवली जाईल अशी मला आशा आहे. एखाद्या टॅक्सीवाल्याने बलात्कार केला तर संपूर्ण टॅक्सी कंपनीला बंद करणे हा त्यावरचा उपाय नाही. त्यांएेवजी अशा प्रकारच्या टॅक्सी कंपन्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी म्हणून कायदे व नियम बनवणे आवश्यक आहे. त्यांनी पुन्हा पुन्हा कायद्याचे उल्लंघन केले तर बंदी आवश्यक आहे, पण कायदेच अस्तित्वात नसताना त्यांचे पालन केले नाही असे म्हणून बंदी घाणे मात्र पूर्णपणे चुकीचे आहे. दिल्ली प्रकरणात उबरच्या बाबतीत थोडेफार तसेच झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s