ब्लूटूथ

2000px-Bluetoothब्लूटूथ हे तंत्रज्ञान हळूहळू आपले जीवन व्यापून टाकत आहे. तुमच्या कडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही ब्लूटूथ वापरला असण्याची शक्यता खूपच मोठी आहे. दरवर्षी नवनवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणे ब्लूटूथचा स्वीकार करत असताना दिसत आहेत. ब्लूटूथ स्पीकर, ब्लूटूथ हेडफोन ह्या गोष्टी एव्हाना मध्यमवर्गीय घरात दिसू लागल्या आहेत.

ब्लूटूथ हा एक कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर दोन उपकरणांना एकमेकांशी बोलण्यासाठी वापरण्यात येणारी ही सांकेतिक भाषा आहे. ह्या संकेतांचा वापर करून दोन उपकरणे एकमेकांशी वायरीचा वापर न करता बोलू शकतात. १९९४ मध्ये एरिक्सन या स्वीडीश कंपनीने हे संकेत बनवले. त्यावेळी एका उपकरणातून माहिती दुसऱ्या उपकरणात टाकण्यासाठी RS-232 डेटा केबलचा वापर होत असे.  या केबलच्या ऐवजी वायररहीत तंत्रज्ञान वापरण्यासाठी म्हणून ब्लूटूथचा जन्म झाला. १९९८ मध्ये एरिक्सन, इंटेल, नोकीया, तोशिबा आणि आय बी एम या जगप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपन्यांनी एकत्र येऊन ब्लूटूथ स्पेशल इंटरेस्ट ग्रुप तयार केला. ब्लूटूथ तंत्रज्ञानाची देखभाल करण्याचे काम ह्या हा स्पेशल इंटरेस्ट ग्रुपकडे देण्यात आले. ब्लूटूथ प्रमाण बनवणे, त्याविषयी इतर कंपन्यांना प्रशिक्षण देणे इत्यादी काम हा स्पेशल इंटरेस्ट ग्रुप करतो. ‘ब्लूटूथ’ हे नाव एका डॅनिश राजाच्या आडनावावरून ठेवलेले आहे. हेराल्ड ब्लूटूथ या डॅनिश राजाने आजकालच्या नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्कमधील अनेक आपआपसात झगडणाऱ्या टोळ्यांना एकत्र आणले. या राजाप्रमाणेच ब्लूटूथ प्रमाण वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना एकत्र जोडण्याचे काम करते. संकेताच्या प्रमाणाव्यतिरीक्त ब्लूटूथ तंत्रज्ञानात हार्डवेअर (चिप) आणि सॉफ्टवेअरही समावेश आहे.

ब्लूटूथ दोन उपकरणांमध्ये रेडीओ लहरींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करते. टिव्ही, एफ एम रेडीओ आणि मोबाइल फोनही रेडीओ लहरींचाच वापर करतात, परंतु या लहरी वेगळ्या प्रकारच्या असतात. त्या माहितीचे वहन अनेक मैल अंतरावर करू शकतात. ब्लूटूथ मध्ये वापरल्या गेलेल्या रेडीओ लहरी माहितीचे वहन फक्त १०० मीटर (३२८ फूट) अंतरावरच करू शकतात. या लहरींची तरंगलांबी (वेव्हलेंग्थ) २.४ ते २.४८५ गिगाहर्टझ् एव्हढी असते. खरंतर २.४ गिगाहर्टर्झवर इतर अनेक वायरलेस उपकरणे चालतात. तुमच्या घरात असलेला वायरलेस राउटरही याच तरंगलांबीचा वापर करतो. त्यामुळे इतर उपकरणे वापरत असलेल्या वायरलेस संपर्काबरोबर ढवळाढवळ टाळण्यासाठी ब्लूटूथ तंत्रज्ञान अडाप्टीव फ्रिक्वेन्सी हॉपिंग या तंत्रज्ञानाचा वापर करते. हे तंत्रज्ञान आजूबाजूची उपकरणे कुठली तरंगलांबी वापरत आहेत हे ओळखून १ मेगाहर्ट्स च्या ७९ वेगवेगळ्या तरंगलांबींपैकी न वापरली गेलेली तरंगलांबी निवडते व त्यावर माहीती पाठवते. त्यामुळे इतर उपकरणांच्या सिग्नलमुळे ब्लूटूथ वर पाठवलेली गेलेली माहिती खराब होत नाही.

ब्लूटूथच्या खऱ्या उदयाला  कारण माझ्या मते ब्लूटूथ स्मार्ट किंवा ब्लूटूथ लो एनर्जी आहे. ब्लूटूथ संकेताच्या ह्या (चौथ्या) आवृत्तीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बॅटरीमध्ये होणारी बचत. हि आवृत्ती वापरणारे उपकरण एखाद्या बटन सेलवरही महिनोन महिने किंवा वर्षभर चालू शकते. आजकाल बाजारात अनेक अतिशय लहान आकाराचे फिटनेस ट्रॅकर, वायरलेस हेडफोन, किचेन इत्यादी गोष्टी आल्या आहेत. ब्लूटूथ स्मार्टमुळे या आकारात बसू शकेल असा सेल लावणे या उपकरणांना शक्य झाले. ब्लूटूथ स्मार्टमध्ये दोन इलेक्ट्रॉनिक उपकरणे ब्लूटूथ कनेक्शननी जोडली गेल्यावर सतत माहितीची देवाण घेवाण करत रहात नाहीत. त्याऐवजी लहानशी माहीती दुसऱ्या उपकरणाकडे पाठवून कनेक्शनला स्लीप मोडमध्ये घातले जाते. पुन्हा माहीती आल्यास उपकरण स्लीप मोडमधून उठते, माहीती सामावून घेते आणि पुन्हा स्लीप मोडमध्ये जाते. त्यामुळे बॅटरीची मोठ्या प्रमाणावर बचत होते.  २००१ मध्ये नोकीयाने त्यावेळी उपलब्ध असलेल्या वायरलेस प्रोटोकॉलमध्ये सुधारणा करण्यासाठी संशोधन सुरु केले. ब्लूटूथ प्रमाणात बदल करून त्यांना २००४ मध्ये ब्लूटूथची एक सुधारीत आवृत्ती प्रकाशित करण्यात यश मिळाले. परंतु हे तंत्रज्ञान लोकांसाठी उपलब्ध करून दिलेले नव्हते.  २००६ मध्ये ते नोकीयाने  ‘विब्री’ नावाने लोकांसाठी खुलं केलं. जून २००७ मध्ये ब्लूटूथ स्पेशल इंटरेस्ट ग्रुपच्या सदस्यांनी विब्रीला ब्लूटूथमध्ये सामावून घ्यायचं ठरवलं.   २०१० ही प्रक्रीया पूर्ण करण्यात आली.  ब्लूटूथची चौथी आवृत्ती विब्रीवर आधारीत होती. ऑक्टोबर २०११ मध्ये ही ब्लूटूथची आवृत्ती वापरणारा पहिला फोन बाजारात आला – आयफोन ४ एस. २०१२ नंतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे ब्लूटूथ स्मार्ट प्रोटोकॉल वापरु लागली होती. ब्लूटूथ स्मार्ट तंत्रज्ञान वापरणारी उपकरणे दोन  प्रकारची असू शकतात. ‘ब्लूटूथ स्मार्ट रेडी’ उपकरणे ब्लूटूथ क्लासिक (आधीची आवृत्ती) व ब्लूटूथ स्मार्ट दोन्हीही वापरतात. ब्लूटूथ स्मार्ट उपकरणे आधीच्या आवृत्ती वापरणाऱ्या उपकरणांबरोबर चालत नाही. आजकाल बाजारात येणारे बहुतेक सर्व स्मार्टफोन हे ब्लूटूथ स्मार्ट रेडी असतात. त्यामुळे ते नवीन अथवा जुन्या प्रकारच्या ब्लूटूथ उपकरणांबरोबर बोलू शकतात. स्मार्टफोनला वेगवेगळ्या गोष्टीबरोबर माहीतीची देवाणघेणाव करायला लागत असल्याने स्मार्टफोनला ब्लूटूथच्या दोन्ही आवृत्या समजणे आवश्यक आहे.  परंतु बाजारात मिळणारे बहुतेक सर्व फिटनेस ट्रॅकर, ब्लूटूथ स्पीकर इत्यादी गोष्टी मात्र फक्त ब्लूटूथ स्मार्ट असतात. ही उपकरणे फक्त ब्लूटूथची नवीन आवृत्ती वापरणाऱ्याच उपकरणांबरोबर बोलू शकतात.  

ब्लूटूथमुळे अनेक उपकरणांमधून वायर गायब होण्याच्या मार्गावर आहे. सुरुवात वायरलेस किबोर्ड व माऊसने झाली असावी. आजकाल ब्लूटूथ वापरणारे वायरलेस किबोर्ड व माऊस म्हणजे विशेष गोष्ट राहीली नाही. आता हळूहळू हेडफोनही त्याच मार्गावर चालले आहेत. स्टीरीओ हेडफोनमध्ये वायर अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर वापरात आहे. परंतु वायरलेस हेडफोनचा खप वाढत चालला आहे. पुढील काही वर्षात हेडफोनमधून वायर नाहीशी झाली तर त्याचे आश्चर्य वाटायला नको. ब्लूटूथ स्पीकरने एव्हाना अमेरिकेच्याच नव्हे तर भारताच्या बाजारातही जम बसवला आहे. फिटनेस ट्रॅकरनी तर ब्लूटूथचा वापर पहिल्यापासूनच केला होता. किंबहुना ब्लूटूथ स्मार्ट तंत्रज्ञान नसते तर फिटनेस ट्रॅकर उपकरणे बाजारात आलीच नसती. ब्लूटूथमुळे गाडी चालवत असताना फोन घेणं खूप सोपं झालं आहे. तसेच फोनवरून गाडीमध्ये गाणी लावणंही सोपं झालं आहे. आजकाल इलेक्ट्रॉनिक्स जगतात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा बोलबाला आहे. तुमच्या घरातील अथवा ऑफिसमधील अनेक साध्या गोष्टी इंटरनेटला जोडल्या जायला सुरुवात झाली आहे. उदाहरणार्थ इंटरनेटला जोडला गेलेला फ्रिज, इंटरनेटला जोडली गेलेली खुर्ची इत्यादी. स्मार्टहोम ही गोष्ट आता एखाद्या चित्रपटातील कल्पना राहीली नसून ती प्रत्यक्षात आली आहे.  तुम्ही घरी आल्यावर चावीने कुलूप न उघडता आपला स्मार्टफोन वापरून कुलूप उघडाल. आत गेल्यावर दिवे लावण्यासाठी स्मार्टफोनवरील बटन दाबाल.  तुमचा टिव्हीही तुम्हाला स्मार्टफोन वापरून चालू करता येईल, त्यावरची चॅनेलही स्मार्टफोनवरूनच बदलता येतील! वर उल्लेखलेल्या गोष्टी अमेरिकेत आज बाजारात उपलब्ध आहेत. आणि अशा प्रकारची बहुतेक सर्वच उपकरणे तुमच्या स्मार्टफोनबरोबर ‘बोलण्यासाठी’ ब्लूटूथचा वापर करत आहेत. त्यामुळे स्मार्टघराचा आणि इंटरनेट ऑफ थिंग्जमधील उपकरणांचा ब्लूटूथ हा एक अविभाज्य हिस्सा बनून राहीला आहे.

अर्थातच कुठल्याही तंत्रज्ञानाप्रमाणे ब्लूटूथ तंत्रज्ञानातही काही समस्या आहेत. इंटरनेटवर अनेक जण ब्लूटूथने आपल्या स्मार्टफोनला कारबरोबर अथवा इतर उपकरणांबरोबर कनेक्ट (पेअर) करता येत नाही अशा आशयाच्या तक्रारी करताना आढळतात. अनेक बेबसाइटनी ब्लूटूथ समस्याविषयी विशेष पान उघडून लोकांना या समस्या कशा सोडवायच्या याविषयी मार्गदर्शन केले आहे. मी स्वत: ब्लूटूथ हेडफोन आणि ब्लूटूथ स्पीकर गेली कित्येक महिने वापरत आहे. माझ्या गाडीशीही ब्लूटूथने कनेक्ट (पेअर) करीत आहे, पण मला क्वचितच अशा समस्यांचा सामना करावा लागला आहे. बहुतेक वेळा मी काहीही न करता माझा फोन माझ्या गाडीला आपोआपच कनेक्ट होतो. या व्यतिरीक्त इंटरनेटवर बरेच लोक ब्लटूथच्या किरणोत्साराविषयी (रेडीएशन) चर्चा करताना दिसतात. परंतु अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या वेबसाइटनुसार ब्लूटूथमुळे होणारा किरणोत्सार सेलफोन मुळे होणाऱ्या किरणोत्साराच्या तुलनेने १००० पट कमी असतो! त्यामुळे अमेरिकन कॅन्सर सोसायटीने लोकांना सेलफोन कानाला लावण्याऐवजी ब्लूटूथ हेडसेट वापरण्याचा सल्ला दिला आहे.

ब्लूटूथला नजिकच्या भविष्यात बरे दिवस येणार आहेत हे मात्र नक्की. जिथपर्यंत दुसरे कुठले तंत्रज्ञान छोट्या अंतरावर माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी पुढे येत नाही तिथपर्यंत ब्लूटूथच राज्य करणार.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s