सोनी पिक्चर्स हॅक

 

THE INTERVIEW Teaser Posterलॉस एंजलीसमधील केदार जोशी (नाव बदललेले) सकाळी सात वाजता उठला आणि भारतातल्या आपल्या चमूला सूचना द्यायला म्हणून त्याने आपला ऑफिसचा लॅपटॉप उघडला. थोडावेळ काम केल्यावर त्याचा लॅपटॉप विचित्र वागू लागला. त्याचा वॉलपेपर आपोआपच बदलला गेला. त्याच्या डेस्कटॉपवरील आयकॉन एक एक करून नाहीसे व्हायला लागले.  केदारला लॅपटॉप हॅक झाला आहे हे कळायला वेळ लागला नाही. त्याने ताबडतोब लॅपटॉप बंद केला. परंतु पुन्हा चालू करायचा प्रयत्न करता तो चालू होईना! केदारने ताबडतोब आपल्या ऑफिसमध्ये फोन केला. आणि त्याला जे कळले ते ऐकून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या कंपनीतील – सोनी पिक्चर्स एन्टरटेनमेंटमधील जवळजवळ प्रत्येक संगणक हॅक झाला होता! आणि प्रत्येक संगणकावरील वॉलपेपर वर लिहीलं होतं – “Hacked by  #GOP – ही तर फक्त सुरुवात आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सोनीचा सर्व डेटा आम्ही इंटरनेटवर टाकू”. सर्व सर्व्हरही हॅक झाले होते, वेबसाईट, ईमेल एव्हढेच नव्हे तर फोन सिस्टीमही बंद झाल्या होत्या. संपूर्ण कंपनीचे कामकाज पूर्णपणे बंद झाले होते.

माझ्या लॉस एंजलीसमधील घरापासून अक्षरश: दोन मैलाच्या अंतरावर सोनी पिक्चर्सचे मुख्य कार्यालय आहे. लॉस एंजलीसमधील भारतीयांपैकी अनेक लोक सोनी पिक्चर्समध्ये काम करतात. २४ नोव्हेंबरच्या सकाळी ज्यांनी ज्यांनी लॅपटॉप उघडून सोनी पिक्चर्सच्या नेटवर्कला कनेक्ट केले त्यांना थोड्याफार फरकाने असाच अनुभव आला. फक्त लॉस एंजलीसमधीलच नव्हे तर सोनी पिक्चर्सच्या न्यूयॉर्कमधील ऑफिसमधे आणि युरोपातिल कचेऱ्यांमध्येही हीच परिस्थिती होती. या हॅकला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा व्यावसायिक कंपनीवर केलेला सायबर अटॅक असं म्हणायला हरकत नाही. २०१४ मध्ये काही मोठ्या अमेरिकन कंपन्यांचे संगणक हॅक करून लोकांचे क्रेडीट कार्ड नंबर चोरी करण्यात आले. परंतु या हॅकमध्ये माहीती चोरी करण्यापेक्षा सोनी पिक्चर्सवर आघात करून कंपनी बंद करण्याचा मानस होता. हा आघात एव्हढा मोठा होता की त्यानंतर सोनीची ईमेल व्यवस्था त्यापुढील कित्येक दिवस बंद होती. बरं एव्हढंच करून हे हॅकर थांबले नाहीत. २७ नोव्हेंबरला या हॅकरनी सोनी पिक्चर्सच्या पाच नवीन चित्रपटाच्या बेकायदेशीर प्रती इंटरनेटवर लोकांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या. तीन चार दिवस होऊनही GOP किंवा गार्डीयन्स ऑफ पीस ही संस्था कोण आहे  आणि त्यांनी सोनी पिक्चर्सवर असा आघात का केला याविषयी कुठलीही माहिती उपलब्ध झालेली नव्हती. २८ नोव्हेंबरच्या आसपास सोनी पिक्टर्सवरील हा अटॅक उत्तर कोरीयाने केला असावा असे वृत्त काही वृत्तपत्रातून झळकले.  सोनी पिक्चर्सचा ‘द इंटरव्ह्यू’ नावाचा विनोदी चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता.  ह्या चित्रपटात दोन अमेरिकन तरुण इंटरव्ह्यूच्या निमित्ताने उत्तर कोरीयाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांना भेटतात आणि त्यांचा खून करतात असे दाखवले होते. ह्या चित्रपटाबद्दल उत्तर कोरीयाने आधीच नाराजी प्रकट केली होती. नाराजी व्यतिरीक्त सोनी पिक्चर्सला उत्तर कोरीयाकडून धमक्याही मिळाल्या होत्या. इकडे हॅकरचे काम चालूच होते. त्यांनी अधिकाधिक माहीती इंटरनेटवर  उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली. सोनीच्या महत्वाच्या पदावरील लोकांचे पगार, त्यांच्या ईमेल, सोनीच्या कर्मचाऱ्यांचे सोशल सिक्युरीटी नंबर (आपल्या आधार सारखे) इत्यादी गोष्टी इंटरनेटवर पोस्ट करणे त्यांनी चालू ठेवले. यात  अनेक चित्रपट ताऱ्यांची महत्वाची कागदपत्रेही होती. सुप्रसिद्ध अभिनेत्री अँजलिना जोलीचा पासपोर्टचाही या कागदपत्रात समावेश होता. सोनी पिक्चर्सशी संबंधित ४७,००० हजार लोकांची खाजगी माहीती इंटरनेटवर उपलब्ध झाली होती.

१ डिसेंबरला सोनी पिक्चर्सने मँडीयंट नावाच्या सायबर सिक्युरीटी कंपनीला ह्या अटॅकचा शोध घेण्यासाठी पाचारण केले. अमेरिकेची एफ बी आयही या तपासात उतरली होतीच. ४ डिसेंबरला असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार सायबर सिक्यरीटी तज्ञांना या अटॅकमध्ये वापरल्या गेलेल्या आज्ञावलीत आणि एका वर्षापूर्वी दक्षिण कोरीयन कंपन्यावर केल्या गेलेल्या सायबर अटॅकमधील आज्ञावलीत साम्य आढळले.  एक वर्षापूर्वीचा हा अटॅक उत्तर कोरीयाने केला होता अशी सर्वसामान्य धारणा होती. त्यामुळे हा अटॅकही उत्तर कोरीयानेच केला असावा अशी चर्चा जोरात सुरु झाली. ५ डिसेंबरला सोनीच्या कर्मचाऱ्यांना ईमेलवरून एक अशुद्ध इंग्रजीत लिहीलेली धमकी मिळाली. या धमकीत तुम्ही सोनी पिक्चर्स वाईट आहे असे घोषित करा अथवा तुमच्यावर आणि तुमच्या कुटूंबांवर तुम्हाला कल्पना करता येणार नाही असा हल्ला करू असे म्हटले होते. ही ईमेल गार्डीयन्स ऑफ पीस या संस्थेकडूनच आली होती. सात डिसेंबरला उत्तर कोरीयाने या हॅकमध्ये आपला हात नाही असे जाहीर केले. परंतु जे झाले ते चांगलेच झाले अशीही त्यांनी टिप्पणी केली. दरम्यान डिसेंबर ५ ला गार्डीयन्स ऑफ पीसने इंटरनेटवरून दहशतवादी चित्रपट दाखवणे ताबडतोब थांबवा अशी धमकी दिली. ही धमकी अर्थातच द इंटरव्ह्यू या चित्रपटाविषयी होती. १३ डिसेंबरला हॅकरनी सोनीच्या अधिक फाईल्स इंटरनेटवर उपलब्ध करून दिल्या, एव्हढेच नव्हे तर नंतर ख्रिसमस गिफ्ट म्हणून अजूनही  जास्त माहीती जाहीर करू अशी धमकीही दिली. १६ डिसेंबरला या सायबर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पत्रकारांना ईमेल पाठवून द इटरव्ह्यू प्रदर्शित न करण्याविषयी धमकी दिली. यावेळी धमकीचे स्वरुप मात्र वेगळे होते. या धमकीत सप्टेंबर ११, २००१ ची आठवण करून देण्यात आली होती. ज्या थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवण्यात येईल त्या थिएटरपासून ज्यांना आपले प्राण हवे आहेत त्यांनी दूर रहावे असे सांगण्यात आले होते. या धमकीचा मात्र जो व्हायचा तोच परिणाम झाला. अनेक थिेएटर चेननी द इंटरव्ह्यू प्रदर्शित करायला नकार दिला. अखेर अनेक महत्वाच्या चेनने अंग काढून घेतल्याने सोनी पिक्चर्सने १७ डिसेंबरला ‘द इंटरव्ह्यू’ चे प्रदर्शन संपूर्णपणे रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. २५ तारखेच्या आधी पत्रकारांसाठी आयोजित केलेले द इंटरव्ह्यूचे खास प्रदर्शनही रद्द करण्यात आले. सोनी पिक्चर्सने या चित्रपटाच्या सर्व जाहिराती दाखवणे पूर्णपणे बंद केले. १९ डिसेंबरला हॅकरनी सोनीशी संपर्क साधून सोनीने द इटरव्ह्यू प्रदर्शित न करण्याचा घेतलेला निर्णय चांगला असल्याचे म्हटले. परंतु डिव्हीडी अथवा व्हिडीओ ऑन डिमांडद्वारे हा चित्रपट उलपब्ध करून दिल्यास आम्ही आमचे काम चालूच ठेवू असेही म्हटले. दरम्यान एफ बी आय ने हा हॅक उत्तर कोरीया सरकारकडूनच झाला असल्याचे समर्थन केले.

सोनी पिक्चर्सच्या द इंटरव्ह्यूचे प्रदर्शन रद्द करण्याच्या निर्णयावर अमेरिकेत जोरदार टिका झाली. खुद्द राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे जाहीर केले. जगाच्या कानाकोपऱ्यातील कुठलातरी एका हुकूमशहा अमेरिकन चित्रपटावर सेन्सरशिप लावतो हे बरोबर नाही असे त्यांनी म्हटले. तसेच अमेरिका या हल्ल्याचा बदला घेईल अशीही धमकी राष्ट्राध्यक्ष ओबामांनी दिली. इतरही अनेक अमेरिकन राजकारणी लोकांनी सोनीच्या या निर्णयावर टिका केली. अमेरिकन संसदेचे भूतपूर्व स्पीकर न्यूट गिंग्रीच यांनी अमेरिकेचा पहिल्या सायबर युद्धात पराभव झाला आहे असे वक्तव्य केले.  दरम्यान सोनी पिक्चर्सचे अध्यक्ष मायकल लिंटन यांनी सी एन एनच्या फरीद झकारीयाला दिलेल्या मुलाखतीत ही चित्रपट लोकांपर्यंत पोचवण्याचा आपला निर्धार व्यक्त केला. दहशतवादी धमक्यांना आपण घाबरलो नाही, थिएटरनी चित्रपट दाखवायला नकार दिल्याने आपल्यापुढे प्रदर्शन रद्द करण्याव्यतिरीक्त कुठलाही पर्याय उरला नव्हता असे त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले. अनेक कलाकारांनी हा आपल्या स्वातंत्र्यावरचा घाला आहे अशा अर्थाची वक्तव्ये केली. दरम्यान सुप्रसिद्ध वायर्ड मॅगेझिनने हा सायबर हल्ला उत्तर कोरीयाने केलेला आहे याबद्दलचा कुठलाही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचा एक लेख प्रकाशित केला.  अमेरिकन सरकारने अधिकृतपणे अजून उत्तर कोरीयावर ठपका ठेवलेला नाही. परंतु एकंदरीत हा हल्ला उत्तर कोरीयानेच केला असावा याबद्दल बहुतेकांचे एकमत दिसते. न्यूयॉर्क टाईम्सने आपला उत्तर कोरीयाने हल्ला केला असल्याचा निष्कर्ष एका निनावी सरकारी अधिकाऱ्याच्या मतावरून बेतला आहे.

या हल्ल्यात सोनी पिक्चर्सचे किती नुकसान झाले असेल याची थोडीशी कल्पना आपल्याला पुढली आकड्यांवरुन येऊ शकते. द इंटरव्ह्यू हा चित्रपट बनवायला सोनी पिक्चर्सला जवळजवळ ४ कोटी डॉलर्स एव्हढा खर्च आला.  त्याव्यतिरीक्त सुमारे ३ कोटी डॉलर्स ह्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी खर्च करण्यात आले. म्हणजे सात कोटी डॉलर्सचा चुराडा झाला आहे. त्याव्यतिरीक्त इतके दिवस ईमेल सिस्टीम व इतर सर्व सर्व्हर बंद असल्याने किती लोकांना काम करता आले नाही तो खर्च वेगळाच. सोनीच्या अनेक भूतपूर्व कर्मचाऱ्यांनी त्यांची माहिती इंटरनेटवर आल्याने सोनीविरुद्ध कोर्टात निष्काळजीपणाचा दावा केला आहे. हा दावा सिद्ध झाला तर नुकसान भरपाई म्हणून पैसे द्यावे लागतील ते वेगळेच. हजारो कर्मचाऱ्यांची खाजगी माहितील इंटरनेटवर आल्याने सोनी पिक्चर्सला या कर्मचाऱ्यांना क्रेडीट मॉनिटरींग सेवा द्यावी लागेल. त्यासाठी जो खर्च येईल तो वेगळाच. आणि या सर्वाव्यतिरीक्त चित्रपट प्रदर्शन रद्द् केल्याने आणि अशा सिस्टीम सुरक्षित नसल्याने जी संपूर्ण जगात नाचक्की झाली आहे ती वेगळीच. त्यामुळे किती नुकसान झाले असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे.

सायबर युद्ध ही चित्रपटात दाखवायची गोष्ट राहिलेली नाही हे या उदाहरणावरून सिद्ध झाले आहे. सायबर युद्धामुळे गंभीर नुकसान होऊ शकते. सोनी पिक्चर्सवरील हल्ल्यामुळे जगातील अनेक देश आणि कंपन्या जाग्या झाल्या असतील. उद्याचे दहशतवादी प्रत्यक्ष आपल्या देशात पाऊल न टाकताही आपलं गंभीर नुकसान करून शकतील. इलेक्ट्रीसीटी ग्रिड, आण्विक उर्जा निर्मिती प्रकल्प बंद पाडू शकतील. त्यामुळेच अशा हल्ल्यांचे गंभीर प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. अमेरिका या हल्ल्याचे केव्हा व कसे उत्तर देते याच्याकडे आता अनेकांचे डोळे लागून राहीले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s