सोशल मिडीया आणि अमेरिकन तरुणाई

Socmed_-_Flickr_-_USDAgov

इंटरनेट आणि सोशल मिडीयाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. आजकाल शाळकरी मुलांकडेही स्मार्टफोन असतात आणि ही मुले यो फोनद्वारे फेसबुक, व्हॉटस्अॅप आणि इतर सोशल नेटवर्किंग साइटवर दिवसरात्र असतात. अमेरिकेत त्याचे काय परिणाम दिसून येत आहेत. या समस्येला अमेरिकन समाज कसा तोंड देत आहे याचा उपापोह करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

अमेरिकेत सोशल मिडीयाचा तरुणाईवर आणि मुलांवर होणाऱ्या परिणामाविषयीची चर्चा सायबर बुलीयींग वर चर्चा केल्याशिवाय कधीच संपत नाही. एकंदरीतच अमेरिकन जनतेमध्ये याविषयी बऱ्यापैकी जागरुकता हळूहळू येऊ लागली आहे.  सायबर बुलीयींग म्हणजे इंटरनेटवरून दिलेल्या शिव्या, धमक्या, आक्रमक किंवा वाईट कॉमेंटस् इत्यादी.  सोशल मिडीयामधून कुणी काही बरंवाईट बोललं तर त्याचा कोवळ्या मनावर परिणाम होऊ शकतो. सायबर बुलीयींगचा परिमाम नेहमी कॉलेजमध्ये होणाऱ्या रॅगिंग अथवा बुलियींगपेक्षा जास्त असू शकतो. तसेच सायबर बुलीयींग २४ तासात कधीही होऊ शकते. एखादा मुलगा किंवा मुलगी एकटी असतानाही तिला सायबर बुलीयींगला सामोरे जायला लागू शकते. सायबर बुलीयींग करणारे लोक अनेक वेळा आपल्या कॉमेंटस् किंवा फोटो पोस्ट करताना खोटी आय डी वापरतात. त्यामुळे ते नक्की कुणी केलं आहे ते बऱ्याच वेळा कळणं कठीण असतं. तसेच सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या कॉमेंटस् अथवा फोटो काही मिनीटातच हजारो अथवा लाखो लोकांपर्यंत पोहचू शकतात. त्यामुळे ज्या व्यक्तीला बुलींयींग केलं जात आहेत त्या व्यक्तीची परिस्थीत अजून कठीण होऊन बसते. तसेच हे मेसेजेस किंवा फोटो दुसऱ्या कुणीतरी अपलोड केले असल्याने ते लगेच काढून टाकणेही सोपे नसते. सायबर बुलीयींगविषयी चर्चा करताना २०१० च्या एका घटनेचा उल्लेख करणे अपरिहर्य आहे. दुर्दैवाने या घटनेत एका भारतीय विद्यार्थ्याचा हात होता. सप्टेंबर १९ २०१० रोजी न्यूजर्सीच्या रटगर्स विद्यापीठात टायलर क्लीमेंटी हा १८ वर्षाचा विद्यार्थी आपल्या हॉस्टेल रुममध्ये एका पुरुषाबरोबर एकटा होता. धरुन रवी हा भारतीय विद्यार्थी त्याचा रुममेट होता. धरुन रवीने आपला वेबकॅम वापरून टायलर क्लीमेंटी आणि त्या पुरुषाचा व्हिडीओ काढला. टायलर क्लिमेंटी ‘गे’ (समलिंगी संबंध ठेवणारा) आहे हे या व्हिडीयोवरून स्पष्ट होत होते. परंतु धरुन रवी इथेच थांबला नाही, त्याने ट्विटरवरून आपल्या मित्रांना याविषयी सांगितले आणि त्यांना व्हिडीओ पाहण्यासाठी बोलवले. २१ सप्टेंबर रोजी धरुन रवीने पुन्हा एकदा व्हीडीओ काढायचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा ट्वीटरवरून लोकांना हा व्हिडीओ लाइव्ह पाहण्यासाठी बोलवले. २२ सप्टेंबर २०१० रोजी टायलर क्क्लीमेंटीने न्यूयॉर्कच्या हडसन नदीवर असलेल्या जॉर्ज वॉशिंग्टन पुलावरून फेसबुक मेसेज पोस्ट केला – ‘जॉर्ज वॉशिंग्टन पुलावरून उडी मारत आहे, सॉरी’. त्यानंतर लगेचच त्याने पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. न्यू जर्सी राज्य सरकारने या प्रकरणात धरून रवीला दोषी ठरवले आणि त्याच्यावर खटला दाखल केला. त्याच्या वर टायलर क्क्लीमेंटीच्या आत्महत्येचा आरोप ठेवला गेला नसला तरी त्यावर टायलर क्लीमेंटीची प्रायव्हसी भंग केल्याचा आरोप ठेवला गेला. त्याला कोर्टाने ३० दिवसाचा तुरुंगवास, १०,००० डॉलर्स दंड आणि सायबर बुलीयींग पुन्हा न करण्यासाठी कॉउन्सीलींग अशी शिक्षा ठोठावली. या केसने संपूर्ण अमेरिकेचेच नव्हे तर जगाचेही लक्ष वेधून घेतले.  त्यातून गे मुलांना मिळणाऱ्या वागणूकीबरोबरच सोशल मिडीयाच्या वापरावरही चर्चा सुरु झाली. या खटल्याने सायबर बुलीयींगसाठी अमेरिकेत एक प्रमाण कायम झाले आहे. आरोपीला शिक्षा झाल्याने अशा प्रकारच्या केसमध्ये तुरुंगवास घडू शकतो हे  आता स्पष्ट झाले आहे.

सायबर बुलीयींगचा त्रास अमेरिकेत मुलींनाही बऱ्याच प्रमाणात भोगावा लागतो. त्यांना फेसबुक, एस एम एस वरून लैंगिक धमक्या दिल्या जातात. आणि हे सर्व सातवी आठवीतल्या मुलामुलींकडून होते. आणि अनेक वेळा यात शाळेतील अनेक मुले सहभागी असतात. एकानी काही आगळीक केली की दुसऱ्या गटाची लोक त्याचा सायबर बदला घेतात. मग हे प्रकरण वाढत जाऊ शकते. एकमेकांविषयी वाईट बोलणे, त्यांचे वाईट फोटो सोशल नेटवर्कींग वरून टाकणे असे प्रकार सुरु होतात. अनेक वेळा या धमक्या घरून अथवा वीकएंडला दिल्या गेल्याने शाळेचा त्यात सहभाग मर्यादित असतो. शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार घेऊन गेली असता अनेक वेळा मुख्याध्यापक कारवाई करू शकत नाहीत. परंतु अलिकडे अनेक शाळांनी या गोष्टींची दखल घेऊन पाऊले उचलली आहेत. अमेरिकेतल्या जवळजवळ प्रत्येक शाळेत काउन्सिलर असतो. हे काउन्सिलर मुलांच्या समस्यांमध्ये मुलांना मदत करतात. आता सोशल नेटवर्किंग संबंधित तक्रारी अनेक शाळांच्या काउन्सिलरकडे करता येतात. जी मुले यात सहभागी असतात त्यांना काउन्सिलर समजावतो. तसेच काही शाळांनी आता प्रकरणे वाढण्याआधी टिप देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. जी मुलं टिप देतील त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतात. परंतु अशा प्रकारचे सायबर बुलियींग टाळण्यासाठी आणि त्याला योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी शाळेपेक्षाही पालकांनी पावले उचलणे जास्त महत्वाचे आहे. अमेरिकेत सायबरबुलीयींग रिसर्च सेंटर ही संस्था या विषयी संशोधन करते. या संस्थेच्या समीर हिंदुजा आणि जस्टीन पॅचिन या संशोधकांनी  Bullying Beyond the Schoolyard – Preventing and Responding to Cyberbuyllying हे पुस्तक लिहीले आहे. हे पुस्तक अॅमेझॉन डॉट इन या बेससाइटवर भारतात उपलब्ध आहे. ज्या पालकांना यात विशेष रस आहे किंवा ज्या पालकांना ही समस्या भेडसावत आहे त्त्यांना हे पुस्तक वाचून नक्कीच मदत होईल. ह्या पुस्तकाचा संदर्भ अमेरिकन असला तरी हा विषय जागतिक असल्याने भारतीयांसाठीही ते उपयुक्त ठरेल अशी माझी खात्री आहे.

अगदी अलिकडेच घटलेल्या अजून एका घटनेने अमेरिकेचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमेरिकेच्या कोलोराडो राज्यातल्या डेनवर शहरातील तीन मुलींनी घरातून पैसे आणि पासपोर्ट चोरून तुर्कस्थानमार्गे सिरीयात जाऊन  आयसिसला मदत करण्याचा प्रयत्न केला.  या मुली फक्त १७ व १५ वर्षाच्या आहेत.  यातील दोन मुली बहीणी आहेत. मुलींच्या शाळेतून त्या शाळेत न आल्याचा फोन आला. पालकांनी चौकशी सुरु केली असता या मुलींचे पासपोर्ट गायब आढळले. तसेच यातील दोन बहीणींच्या घरातून २,००० डॉलर्स गायब झालेलेही आढळले. पालकांनी लगेच एफ बी आयकडे धाव घेतली. या मुलींचे पासपोर्ट लगेचच लॉक करण्यात आले. आणि त्यामुळेच जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर त्यांना पकडून अमेरिकेत परत पाठवण्यात आले. त्यांच्या चौकशीतून आणि त्यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांना जिहादी तत्वांनी सोशल मिडीयाचा वापर करून या मुलींना आपल्या जाळ्यात ओढल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. यातील ज्या १७ वर्षीय मुलीने यात पुढाकार घेतला होता, तिच्या सोशल मिडीया वरील संभाषणांवरून तिचे कडव्या इस्लामी तत्वाकंडे सुरु झालेला कल दिसून येतो. उदाहरणार्थ काही महिन्यांपूर्वी तिच्या सोशल मिडीया पोस्टवरून ही मुलगी तासनतास गाणी ऐकते हे स्पष्ट होते. परंतु कडव्या तत्वांशी संपर्क आल्यानंतर तिने संगीत हे वाईट असून ते ऐकणे बंद केल्याचे दिसते. दहशतवादी तत्वेही अशा मुलामुलींना आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या सोशल मिडीयावर वापरत असल्याचे आढळून आले आहे. ज्या गोष्टी सध्या चर्चेत आहेत – उदाहरणार्थ इबोला, वर्ल्ड कप इत्यादी हॅशटॅग वापरून ते आपले मेसेजेस सोशल मिडीयावर पसरवतात. तसेच हुशारीने तयार केलेले अनेक व्हिडीओही आयसिस सारख्या संघटना सोशल मिडीयावर अपलोड करतात. या व्हिडीओमध्ये लोकांची मुंडकी कापण्यापर्यंतच्या गोष्टी दाखवलेल्या असतात पण प्रत्यक्ष मुंडकी कापल्याचे दाखवल्याने लोक या गोष्टीपासून दूर जातील म्हणून प्रत्यक्ष तो क्षण दाखवला जात नाही. भारतामध्येही अलिकडेत ‘शमि विटनेस’ या आयसिसची भलामण करणारे ट्विटर हँडल चालवणारा पकडला गेला आहे. संपूर्ण जगालाच सोशल मिडीयाच्या या वापरापासून सावध राहणे आवश्यक आहे.

अनेक वेळा आपण सोशल मिडीयाशी चर्चा करतातना त्याच्या वाईट गोष्टींचीच चर्चा करतो. परंतु सोशल मिडीयामुळे तरुणाईमध्ये आत्मविश्वास वाढू शकतो असेही काही लोकांना आढलले आहे. सीएनएन मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार कॉमन सेन्स मिडीया या संस्थने केलेल्या पाहणीमध्ये १३ ते १७ वर्षे वयोगटातील १००० मुलांचा सहभाग होता. यातील  सुमारे २० टक्के मुलांचा आत्मविश्वास सोशल मिडीयामुळे वाढतो असे आढळून आले आहे. केवळ ४ टक्के मुलांनीच सोशल मिडीयामुळे आत्मविश्वास कमी होतो असे म्हटले आहे.  या पाहणीत सुमारे २९ टक्के मुलांनी सोशल मिडीयामुळे आपला लाजरेपणा कमी झाला असेही म्हटले आहे. केवळ ३ टक्के मुलांनीच सोशल मिडीयामुळे लाजरेपणा वाढला असे म्हटले आहे. तसेच ५२ टक्के मुलांनी आपल्या मित्र मैत्रिणींशी असलेले संबंध सोशल मिडीयामुळे वाढले असल्याचे म्हटले आहे. केवळ ४ टक्के मुलांनीच सोशल मिडीयामुळे मैत्रीवर परिणाम झाल्याचे म्हटले आहे.  एखादी मुलगी जेव्हा इन्स्टाग्रामवर किवा फेसबुकवर आपली ‘सेल्फी’ (स्वत: काढलेला स्वत:चा फोटो) टाकते तेव्हा  बहुतेक मित्र मैत्रीणींनी  त्यावर – वाह किती सुंदर दिसतेस तू – अशाच प्रतिक्रीया व्यक्त करतात असे एका आईला आढळून आले. त्यामुळे आपल्या मुलीचा आत्मविश्वास वाढल्याचे तिने म्हटले आहे. अशा प्रकारच्या सकारात्मक वापरामुळे सोशल मिडीया मुलांच्या विकासामध्ये मदतगार होऊ शकते.

 माझ्या मते काही तत्वांनी वाईट वापर केला म्हणून संपूर्ण सोशल मिडीयाला वाईट ठरवणे अथवा मुलांना त्याचा वापर करू न देणे चुकीचे ठरेल. अशा प्रकारची बंदी घातली असता मुले चोरून या गोष्टी करतील. त्याऐवजी मुलांना सोशल मिडीयावर कसे वागावे याची समज देऊन मग त्यांना सोशल मिडीया वापरायला देणे जास्त संयुक्तिक ठरेल. तसेच एकदा त्यांनी वापर सुरु केला की त्या वापरावर लक्ष ठेवणेही अतिशय गरजेचे आहे.  पालकांना अशा प्रकारचे लक्ष ठेवायल मदत करणारी सॉफ्टवेअर एव्हाना अमेरिकन बाजारपेठेत आली आहेत. नेट नॅनी (Net Nanny) नावाचे असेच एक सॉफ्टवेअर तुम्हाला तुमच्या मुलाच्या (अथवा मुलीच्या) फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, टम्बलर, गुगल प्लस, पिन्टरेस्ट इत्यादी सोशल नेटवर्कवरील प्रोफाइलवर लक्ष ठेवायला मदत करते.  एखाद्या पोस्टमध्ये अथवा कॉमेंटमध्ये एखादी आक्षेपार्ह गोष्ट आढळल्यास हे सॉफ्टवेअर तुम्हाल इमेल अथवा एस एम एसही करु शकते.

 

एकंदरीत अमेरिकेतील सोशल मिडीया आणि तरुणाई संबंधित समस्या भारतापेक्षा फारशा वेगळ्या नाहीत. किंबहुना अमेरिकेत इंटरनेटचा प्रसार जास्त असल्याने भारताने अमेरिकन समस्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ज्या समस्या अमेरिका आज अमुभवते आहे त्या भारताला सध्या भेडसावत नसल्या तरी नजिकच्या भविष्यात भेडसावण्याची शक्यता आहे.  त्यामुळे अमेरिका या समस्या कशा सोडवायचा प्रयत्न करते आहे यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s