ओरायन – अमेरिकेचा मंगळप्रवासातील महत्वाचा टप्पा

Orion_with_ServiceModule

मंगळ ग्रहाकडे मानवाने आपले डोळे लावले आहेत ही गोष्ट आता सर्वांनाच माहित आहे. भारतानेही अलिकडेच मंगळाच्या कक्षेत यान पाठवून या क्षेत्रात आपणही कमी नाही हे दाखवून दिले.  अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था -नासाने मात्र ५ डिसेंबरला मंगळ प्रवासातील एक महत्वाचा टप्पा गाठला.  नासाने मानवाला अवकाशात घेऊन जाणाऱ्या आपल्या नवीन यानाची – ओरायनची यशस्वी चाचणी घेतली.

अमेरिकेकडे सध्या अंतराळात जाण्यासाठी कुठलेही यान नसल्याने या चाचणीचे विशेष महत्व आहे. आंतराष्ट्रीय स्पेस स्टेशनसाठी अमेरिका आपली स्पेस शटल वापरत असे. परंतु २०११ मध्ये स्पेस शटलला निवृत्त करण्यात आले. त्यानंतर आंतराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीर पाठवण्यासाठी  अमेरिकेला रशियाची मदत घ्यावी लागते. एका अंतराळवीराला स्पेस स्टेशनवर पाठवण्यासाठी रशिया तब्बल ७१ दशलक्ष डॉलर्स वसूल करते. तसेच अमेरिका व रशिया यांचे संबंध युक्रेन युद्धानंतर खराब झाल्याने रशियाची मदत घेणे राजकीय दृष्ट्या अधिकाधिक कठीण होऊन बसले आहे. त्यामुळेच अमेरिकेत या यानाविषयी विशेष उत्साह आहे.  नासाचे प्रमुख चार्ल्स बोल्डन यांनी मंगळयुगाचा आज पहिला दिवस अाहे अशी प्रतिक्रिया या यशस्वी चाचणीनंतर दिली आहे.

फ्लोरीडा राज्यातील केप कनाव्हरल एअर फोर्स बेसवरून ओरायनने ५ डिसेंबरच्या सकाळी सात वाजून पाच मिनीटांनी उड्डाण केले.  पृथ्वीपासून अंदाजे ५,८०० किलोमीटर अंतरावर जाऊन सुमारे साडे चार तासाने ओरायन पृथ्वीवर परत आले.  मेक्सिकोच्या बाहा द्विपकल्पाच्या जवळ २७० मैलावर प्रशांत महासागरात ओरायन उतरले. ही चाचणी असल्याने या यानामध्ये अंतराळवीर नव्हते. अमेरिकन नौदलाच्या नौकेने या यानाला परत आणण्यात आले.  या चाचणीतून अनेक गोष्टी स्पष्ट होतील. सर्वप्रथन ओरायन व्हॅन अॅलन पट्ट्यातील किरणोत्सार सहन करू शकते की नाही हे यातून  स्पष्ट होईल.  पृथ्वीभोवती किरणोत्सार असलेले दोन मोठे पट्टे आहेत. या पट्ट्यातील किरणोत्सारापासून अनेक कृत्रिम उपग्रहांना वाचवावे लागते.  अंतराळात लांब अंतरावर जायचे असेल तर अशा किरणोत्साराचा सामना करणे आवश्यक आहे.  आणि त्याहूनही महत्वाची चाचणी म्हणजे हे यान पृथ्वीच्या वातावरणात परत येऊ शकेल की नाही. अशा प्रकारचे यान जेव्हा अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणात परत येते तेव्हा त्याचा वेग तब्बल ताशी तब्बल ३२,००० किमी एव्हढा असतो!!!  एव्हढ्या वेगाने पृथ्वीवर परत येत  असताना आत बसलेल्या अंतराळवीराला तब्बल ८.२ जी-फोर्सचा सामना करावा लागतो! हा जी फोर्स रशियन सोयुझ यानाच्या तुलनेने दुप्पट आहे.  पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे अशा प्रकारचा जी फोर्स आपल्याला अनुभवायला मिळतो. केवळ ११ मिनीटात ताशी ३२,००० किमी वरून पाण्यात पडतेवेळी ओरायनचा वेग ताशी ३२ किमीवर आणण्यात आला. यासाठी ८ वेगवेगळ्या वेळी बाहेर येणाऱ्या पॅराशूटचा वापर करण्यात आला. तसेच वातावरणातील घर्षणामुळे या यानाच्या बाहेरील पृष्ठभागाचे तापमान तब्बल २,२०० डिग्री सेल्सियस एव्हढे वर जाऊ शकते!  बाहेरील तापमान  एव्हढे असूनही आतील तापमान मात्र एखाद्या मनुष्याला सहन होईल इतके कमी असणे आवश्यक आहे.  त्यासाठी विशेष प्रकारची हीट शिल्ड वापरण्यात येते. ओरायनच्या या उड्डाणात या हीट शिल्डची चाचणी घेणे हे एक महत्वाचे उद्दीष्ट होते. ही चाचणीही उत्तम रित्या पार पाडली.  यान पाण्यात पडत असताना या भागात मुद्दाम फिरत ठेवलेल्या मानवरहीत ड्रोनने अनेक फोटो व व्हिडीओ घेतले आहेत. अमेरिकन नौदलाच्या युएसएस अँकरेज या अजस्त्र नौकेने या यानाला परत आणले.

चंद्रावर जाऊन आलेल्या अपोलो यानानंतर एव्हढ्या दूर जाऊ शकणारे हे पहिलेच यान आहे.  ओरायनचे तीन मुख्य भाग आहेत. एक शंकू आकाराचे क्रू मॉड्यूल – यात अंतराळवीर बसतील. आणि दुसरा भाग दंडगोलाकृती असून त्याला सर्विस मॉड्यूल असे म्हणतात. यात अंतराळवीरांसाठी प्राणवायू व पाणी साठवलेले असते. सर्विस मॉड्यूलमध्ये इंधन असते व अंतराळयानाला चालवणारी यंत्रणाही असते.  तिसऱ्या भागाला लाँच अबॉर्ट सिस्टीम म्हणतात. ह्या यंत्रणेद्वारे ओरायन अंतराळयानाला लाँचिंग रॉकेटपासून वेगळे करता येते. लाँचींगमध्ये गडबड झाली असताही याचा रॉकेटपासून सुटका करून घेण्यासाठीही वापर करता येतो. या चाचणीमध्ये फक्त क्रू मॉड्यूलचाच वापर करण्यात आला. ११ फूट उंचीचे व १६.५ फूट पाया असलेले  हे क्रूर मॉड्यूल  शंकू आकाराचे आहे. याच्या सध्याच्या आवृत्तीमध्ये माणसांसाठी सीट लावलेल्या नसल्या तरी पुढील आवृत्तीमध्ये त्या लावण्यात येतील.  याचा आराखडा सहा लोकांना तीन आठवड्याच्या छोट्या मिशनसाठी घेऊन जाण्यासाठी अथवा चार लोकांना लांब पल्ल्याच्या मिशनला घेऊन जाण्यासाठी बनवण्यात आला आहे.  या क्रू मॉड्यूलमध्ये  सुमारे १२०० सेन्सर लावण्यात आले आहेत. या सेन्सरमुळे यानाच्या संपूर्ण प्रवासात वेगवेगळ्या गोष्टींची मोजमापे नासाला घेता आली. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ओरायनच्या पुढील आवृत्तीमध्ये सुधारणा करता येतील.   अनेक सेन्सरव्यतिरीक्त या यानामध्ये कॅमेराही बसवण्यात आला होता. या कॅमेराने घेतलेली पृथ्वीची चित्रे नासाने आपल्या ट्विटर पानावर घातली आहेत. ह्या यानाचे क्रू मॉड्यूल बनवण्याचे ३७० दशलक्ष डॉलर्सचे कंत्राट नासाने लॉकहीड मार्टीन या कंपनीला दिले होते.  लॉकहीड मार्टीनने क्रू मॉड्यूलच्या पुढच्या आवृत्तीवर काम करणे सुरु केले आहे. सर्विस मॉड्यूल बनवण्याचे काम युरोपियन स्पेस एजन्सीतर्फे एअरबस डिफेन्स अँड स्पेस ही युरोपियन कंपनी करणार आहे. लाँच अबॉर्ट सिस्टीम बनवायचे काम अमेरिकेच्याच ऑरबिटल सायन्सेस कंपनीला देण्यात आले आहे.

ओरायनच्या उड्डाणाकरता यावेळी डेल्टा – ४ हे अमेरिकेकडे असणारे सर्वात शक्तिशाली रॉकेट वापरण्यात आले. परंतु या रॉकेटचा अंतराळात खोलवर जाण्यासाठी वापर होऊ शकत नाही. त्यासाठी अजून शक्तिशाली रॉकेट बनवणे आवश्यक आहे. म्हणून नासाने नवीन स्पेस लाँच सिस्टीम नावाचे मेगारॉकेट बनवायला घेतले आहे. ओरायनला   अंतराळात पाठवण्यासाठी २०१८ मध्ये या रॉकेटचा वापर करता येईल.  या रॉकेटबरोबर २०१४ मध्ये वापरण्यात आलेलेच क्रू मॉड्यूल दुरुस्त्या करून वापरण्यात येईल. युरोपियन स्पेस एजन्सीने बनवलेल्या सर्विस मॉड्यूलची चाचणीही याच वेळी घेतली जाईल. त्यापूर्वी २०१७ मध्ये ओरायनला अजून एक वेळा अंतराळात पाठवण्याची योजना आहे. २०१७ च्या उड्डाणासाठी नवीन ओरायन यान वापरण्यात येईल. हे यान एक आठवडा अंतराळात राहून चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परत येईल. प्रत्यक्ष मानावाला ओरायनमधून अंतराळात पाठवायला मात्र २०२१ साल उजाडेल असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.  नासाने अंतराळातील एक लघुग्रह (अॅस्टरॉइड) पकडून तो चंद्राच्या कक्षेत सोडण्याची योजना तयार केली आहे.  ओरायनच्या पहिल्या मानवी उड्डाणात हया लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी अंतराळवीरांना पाठवण्याची योजना आहे.  ओरायन वापरून मंगळ ग्रहापर्यंत जाण्यासाठी मात्र अजून अनेक वर्षे जावे लागतील. सध्याच्या योजनेप्रमाणे मानवाला मंगळापर्यंत पोचण्यासाठी २०३० साल उजाडावे लागेल.

ओरायनचा वापर मंगळ ग्रहाकरता होणार असला तरी मंगळावर जाण्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी नासाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यातील सर्वात मोठा अडथळा हा आर्थिक अडथळा आहे. मंगळावर जाण्यासाठी तंत्रज्ञानावर अजून हवी तेव्हढी प्रगती झालेली नाही. मंगळावर पोचण्यासाठी साधारणत: १५० ते ३०० दिवस लागू शकतात. परत येण्यासाठीही तेव्हढाच वेळ लागू शकतो. म्हणजे जवळ जवळ दिड-दोन वर्षे प्रवास करू शकेल असे अंतराळयान बनल्याशिवाय मंगळावर जाणे शक्य नाही. ओरायनला तो पल्ला गाठण्यासाठी बराच काळ – एका दशकाहूनही अधिक काळ जावा लागेल. त्यासाठी नासाला सतत आर्थिक पाठबळ लागेल. अमेरिकन अर्थव्यवस्थेची परिस्थिती कशी असेल त्यावर हे आर्थिक पाठबळ अवलंबून असेल.  तसेच अमेरिका चंद्रावर जाऊन पोचली तेव्हा अमेरिकेची सोव्हिएट युनियनशी अंतराळ संशोधन क्षेत्रात जोरदार स्पर्धा सुरु होती. आता रशियाशी त्याप्रमाणे स्पर्धा नसल्याने येणारी सरकारे  हे आर्थिक पाठबळ देतील की नाही यावर मंगळप्रवास अवलंबून राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s