फर्ग्युसन घटना – अजूनही अमेरिकेत वर्णभेद?

Police Shooting Missouri

जिथे मायकल ब्राउनला गोळ्या घातल्या गेल्या ती जागा

२४ नोव्हेंबरला अमेरिकेतील सेंट लुईसजवळील फर्ग्युसनमधील ग्रँड ज्युरींनी डॅरन विल्सन या गोऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर आरोप न ठेवण्याचा निर्णय घेतला. ९ ऑगस्टला डॅरन विल्सनने मायकल ब्राउन या कृष्णवर्णीय  मुलाला गोळ्या घातल्या. या गोळ्या गरज नसताना, मायकल ब्राउन कृष्णवर्णीय असल्याने मारल्या गेल्या असा आरोप मायकल ब्राऊनच्या आईवडिलांनी व इतर कृष्णवर्णीयांनी डॅरन विल्सनवर ठेवला.  ग्रँड ज्युरींचा निर्णय जाहिर झाल्यावर अमेरिकेतील अक्षरश: शेकडो शहरातून मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष असूनही वर्णभेद अजून संपलेला आहे की नाही यावर अमेरिकेत या निमित्ताने मोठी चर्चा सुरु झाली आहे.

९ ऑगस्टच्या सकाळी फर्ग्युसनमध्ये नक्की काय घडलं ते प्रथम समजून घेणं आवश्यक आहे.  सकाळी ११ वाजून ५४ मिनीटांनी  मायकल ब्राउन हा १८ वर्षीय धिप्पाड मुलगा आपला कृष्णवर्णीय मित्र डोरीयन जॉन्सन याच्याबरोबर फर्ग्युसन मार्केट अँड लिकर नावाच्या दुकानातून बाहेर आला. मायकल ब्राउन आणि डोरीयन जॉन्सनने या दुकानातून सिगारीयो (एक प्रकारच्या सिगार) चोरल्या होत्या (हे सर्व्हेलन्स व्हिडीयोवरुन सिद्ध झाले आहे).  दुकानातून बाहेर आल्यावर हे दोघे फुटपाथऐवजी रस्त्यातून चालू लागले.  इथे भारतीय वाचकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की अमेरिकेत कोणीच फुटपाथ सोडून रस्त्यावरून चालत नाही.  सुमारे १२ वाजून १ मिनाटाच्या सुमारास डॅरन विल्सन या गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याने आपल्या गाडीतून त्याना रस्तातून चालताना पाहिले.  त्यानी गाडी थांबवून त्यांना फुटपाथवर जाण्यास सांगितले.  दुकानदाराने एव्हाना पोलिसात सिगार चोरल्याची तक्रार केली होती.  या दोघांचे  वर्णन आजूबाजूच्या  परिसरातील पोलिस गाड्यांवर वायरलेसवरून एव्हाना पोचले होते. रस्त्यावरून चालणारे युवक तेच आहेत हे डॅरन विल्सनच्या लक्षात आले. त्याने वायरलेसवर कंट्रोल रुमशी संपर्क करून आपल्याला सिगार चोरी करणारे चोर मिळाल्याचे सांगितले. तसेच त्यांना पकडण्यासाठी त्याने आपली गाडी मागे घेऊन ट्रॅफिक अडवले व या दोघांचा रस्ता रोखला. डॅरन विल्सन गाडीतून उतरायच्या आधीच त्याची मायकल व डोरीयन बरोबर झटापट झाली. या झटापटीत दोन गोळ्या चालवल्या गेल्या. या दोन गोळ्यापैकी एक गोळी मायकल ब्राउच्या अंगठ्याला चाटून गेली व दुसरी गोळी कुणालाही न लागता हवेत चालवली गेली.  गोळी चालवल्यानंतर मायकल ब्राउन पळून जाऊ लागला. डॅरन विल्सन गाडीतून बाहेर येऊन मायकलचा पाठलाग करु लागला. धावता धावता मायकल ब्राऊन थांबला व उलट्या दिशने फिरुन डॅरन विल्सनच्या दिशेने येऊ लागला. ते पाहून डॅरन विल्सनने गोळ्या चालवल्या. या गोळ्यांमुळे मायकल ब्राउन जखमी झाला व त्यातूनच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेने फर्ग्युसनमध्ये लगेचच तणाव पसरला. लोकांनी जाळपोळ केली, दुकाने लुटली, निदर्शने केली. मायकल ब्राउन कृष्णवर्णीय असल्याने त्याच्याकडे शस्त्र नसतानाही डॅरन विल्सनने त्याला मारले अशा बातम्या पसरु लागल्या. दुर्दैवाने अमेरिकेत यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत.  संशयित कृष्णवर्णीय असेल तर त्याच्याकडे बंदूक  असेल आणि त्याला मारले नाही तर तो आपल्याला मारेल अशा प्रकारचे समज (किंवा गैरसमज) येथील समाजात आहेत. या समजामुळेच अनेक वेळा कृष्णवर्णीय लोक नि:शस्त्र असूनही त्यांच्यावर शस्त्राचा वापर केला जातो असे येथील कृष्णवर्णीयांचे म्हणणे आहे. फेब्रुवारी २०१२ मध्ये अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातही अशीच घटना घडली होती. ट्रेव्ह़ॉन मार्टीन नावाच्या १७ वर्षीय कृष्णवर्णीय तरुणाला जॉर्ज झिमरमन या हिस्पॅनिक (दक्षिण अमेरिकन स्पॅनिश वंशाच्या) माणसाने स्वसंरक्षणार्थ गोळ्या घातल्या. ट्रॅव्ह़ॉन मार्टीनकडे कुठल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते. पोलिसांनी प्रथम जॉर्ज झिमरमनच्या म्हणण्याला दुजोरा देत त्याला सोडून दिले. परंतु देशभर त्यानंतर उठलेल्या गदारोळामुळे त्याच्यावर खुनाचा खटला भरण्यात आला. या खटल्यामध्ये जॉर्ज झिमरमनची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

फर्ग्युसनमधल्या घटनेनंतर डॅरन विल्सनवरही कारवाई व्हावी की नाही यावर चर्चा सुरु झाली.  अमेरिकेतील अनेक राज्यात ग्रँड ज्युरी पद्धत आहे. एखाद्या संशयितावर आरोप ठेवून खटला चालवायचा की नाही यासाठी ग्रँड ज्युरी बसवले जातात. हे लोक म्हणजे सामान्य नागरीकच असतात. मिसुरीच्या कायद्यानुसार या केसमध्ये आरोप ठेवावा की नाही यासाठी १२ ज्युरींची निवड करण्यात आली. त्यातील ९ गोरे व ३ काळे होते (हे मुद्दाम केलेले नसावे). १२ पैकी ९ ज्युरींचे एकमत होणे आवश्यक होते. सर्वसाधारण खटल्यात सरकारची भूमिका स्पष्ट असते. सरकारी वकील संशयितावर आरोप ठेवतात आणि त्याप्रमाणे पुरावे सादर करतात. या आरोपात तत्थ्य आहे की नाही एव्हढेच ग्रँड ज्युरींनी सांगायचे असते. आरोपात तथ्य आढळले तर आरोपीवर खटला भरला जातो आणि खटला चालवला जातो. म्हणजे ही प्रक्रीया खटला सुरु होण्यापूर्वीची आहे हे लक्षात घेतले पाहिजे. मायकल ब्राउन केसमध्ये मात्र अनेक गोष्टी वेगळ्या घडल्या.  आणि त्यामुळेच या केसच्या वादग्रस्ततेमधे अजून भर पडली! सरकारी वकीलांनी डॅरन विल्सनवर आरोप न लावता फक्त केसमधील सर्व पुरावे आणि घटना ज्युरींसमोर मांडल्या. आरोप लावायचा की नाही ही जबाबदारी ज्युरींवर सोपवण्यात आली. सर्वसाधारणत: आरोपीला अशा केसमध्ये ज्युरींसमोर बोलायला सांगितले जात नाही. पण या केसमध्ये सरकारी वकील रॉबर्ट मकक्लॉ यांनी डॅरन िवल्सन याला ज्युरींसमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली.  सरकारी वकील रॉबर्ट मॅकक्लॉ यांच्या पोलिस वडिलांची हत्या एका कृष्णवर्णीयाकडून झाली असल्याने त्यांच्या हातून असे कृत्य घडले असावे असा आरोपही काही लोकांनी ठेवला आहे. रॉबर्ट मॅकक्लॉ यांनी या केसमधून आपणहून बाजूला व्हायला हवे होते असेही काही लोकांनी म्हटले आहे. परंतु माझ्या मते सरकारी वकीलांनी पोलिसावर आरोप न ठेवणे ही काही विशेष गोष्ट नाही. सरकारी वकील आणि पोलिस एकत्रच काम करत असल्याने हे अपेक्षितच आहे. सर्व साक्षीदार, डॅरन विल्सन आणि इतर पुरावे पाहून ज्युरींनी डॅरन विल्सनवर आरोप ठेवायचे कुठलेही कारण दिसत नाही असा निवाडा दिला. १२ ही ज्युरींनी एकमताने हा निर्णय दिला की ९ गोऱ्या ज्युरींनी हा निर्णय दिला हे जाहिर करण्यात आलेले नाही.

ज्युरींपुढे आलेल्या साक्षीदारांनी त्या दिवशी सकाळी नक्की काय घडले याची वेगवेगळी हकीकत सांगितली. मायकल ब्राउन बरोबरील मुलगा डोरीयन जॉन्सनने सांगितलेल्या हकीकतीत आणि डॅरन विल्सनच्या हकीकतीतही फरक आहे. परंतु फोरेन्सिक पुरावा डॅरन विल्सनच्या हकीकतीला बरोबर ठरवतो. कदाचित त्यामुळेच की काय ज्युरींनी डॅरन विल्सनने सांगितलेली हकीकत ग्राह्य धरली. यातील सर्वात मोठा वादाचा मुद्दा म्हणजे डॅरन विल्सनने जेव्हा मायकल ब्राउनला गोळ्या घातल्या तेव्हा मायकल ब्राउनने हात वर करून शरणागती पत्करतील होती की नाही. डॅरन विल्सनच्या मते मायकल ब्राउनने हात वर न करता आपल्या पँटमध्ये हात घालण्याचा (बंदूक काढण्यासाठी) प्रयत्न केला आणि ते पाहूनच त्याने गोळ्या चालवल्या. परंतु काही साक्षीदारांच्या मते मायकल ब्राउनला गोळ्या लागताना त्याचे दोन्ही हात वर होते. ज्युरींचा निर्णय जेव्हा जाहीर झाला तेव्हा या सर्व वादांमुळे अजूनच भडका उडाला. अमेरिकेतली शेकडो शहरातून निदर्शने झाली.  देशभरातील निदर्शनात कृष्णवर्णीयांनी आपले हात वर करून ‘हँडस् अप, डोन्ट शूट’ अशा घोषणा दिल्या. लॉस एंजलीसमध्येही रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला.  परंतु पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या निदर्शकांना अटक करून रस्ता मोकळा करून दिला. राष्ट्राध्यक्ष ओबामांंना लोकांनी शांत रहावे आणि कायदेशीर कारवाई पूर्ण होऊ द्यावी असे आवाहन करावे लागले.

२८ वर्षीय डॅरन विल्सनवर आरोप न ठेवण्याचा निर्णय झाला असला तरी त्याची डोकेदुखी नक्कीच संपलेली नाही. २९ नोव्हेंबरला त्याने फर्ग्युसन पोलिसदलातून राजीनामा दिला. फर्ग्युसनच्या बहुतांशी कृष्णवर्णीय असलेल्या लोकांनी त्याला पुन्हा युनिफॉर्म पाहून भडका उडण्याची शक्यता होती. डॅरन विल्सनला आयुष्यभर आता एका कृष्णवर्णीयाला मारलेला पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जाईल. डॅरन विल्सनला आयुष्यात कधीही पोलिसाचे काम करता येणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे.  तसेच त्याच्यावरील कायदेशीर कारवायाही अजून संपलेल्या नाहीत. विल्सनवर चालू असलेली फर्ग्युसन पोलिस दलाअंतर्गत चौकशी अजून संपलेली नाही. त्या व्यतिरीक्त केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टीसने दोन नवीन चौकशा सुरु केल्या आहेत. यातील एक चौकशी विल्सनने मायकल ब्राउनचे नागरी अधिकार नाकारले की नाही या वर आहे. तर दुसरी चौकशी संपूर्ण फर्ग्युसन पोलिस दलावरच आहे. फर्ग्युसन पोलिस दलाने यापूर्वी कृष्णवर्णीयांच्या विरुद्भ भेदाभेद केलेला आहे का याची तपासणी केली जाणार आहे. परंतु या चौकशा राजकीय कारणामुळे – कृष्णवर्णीयांना शांत करण्यासाठी सुरु केलेल्या आहेत असेही काही जाणकारांचे म्हणणे आहे. यातून डॅरन विल्सन दोषी ठरण्याची शक्यता कमी मानेली जाते.  परंतु  ब्राउन कुटूंबियांकडे विल्सन व फर्ग्युसन पोलिस दलाविरुद्ध दिवाणी दावा लावण्याचा पर्याय अजूनही खुला आहे.  ब्राउन कुटूंबियांनी प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट मायकल बेडन याच्याकडून खास शवचिकित्सा करून घेतली. त्यातून मिळालेल्या माहितीचा वापर अशा प्रकारच्या दाव्यात केला जाऊ शकतो. फर्ग्युसन पोलिस दलाकडून नुकसानभरपाई घेण्यासाठी हा पर्याय अवलंबला जाईल असे जाणकारांना वाटते.

वर्णभेद ही अजूनही ज्वलंत समस्या आहे हे या प्रकरणातून नक्कीच सामोरं आलं आहे. डॅरन विल्सनची यात काहीही चूक नसली असं मानलं तरी लाखो कृष्णवर्णीयांना आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटत असेल तर वर्णभेद संपला नाही असेच म्हणावे लागेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s